संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची विशेष पोलिस महानिरीक्षकांनी केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 04:34 PM2023-06-05T16:34:43+5:302023-06-05T16:36:28+5:30
नसीर शिकलगार फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कालावधीमध्ये कायदा सुव्यवस्था रहावी तसेच वाहतूक सुरळीत रहावी या ...
नसीर शिकलगार
फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कालावधीमध्ये कायदा सुव्यवस्था रहावी तसेच वाहतूक सुरळीत रहावी या दृष्टीने पोलिस प्रशासन काटेकोरपणे लक्ष देणार असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले. फुलारी यांनी आज, सोमवार पालखी सोहळा मार्गाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
विशेष पोलिस महानिरीक्षकांनी निरा दत्त घाट, लोणंद पालखीतळ, तरडगाव पालखीतळ, फलटण पालखी तळ व बरड पालखीतळ यांची आणि पालखी मार्गाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, फलटण नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात १८ जूनला श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. या कालावधीत भाविकांना पायी चालताना कोणत्याही अडचणी येऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यादृष्टीने स्थानिक अधिकारी व पोलिसांशी आपण संवाद साधत असल्याचेही फुलारी यांनी सांगितले.
पालखी सोहळा मार्गामध्ये कोणाला काही अडचणी आल्यास त्यांनी त्वरित पोलिस किंवा प्रशासनाची संपर्क साधण्यासाठी सर्व अधिकारी व पोलिसांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी काळात अनेक जण आकडे टाकून वीज घेत असतात त्यामुळे मोठी दुर्घटना घडू नये म्हणून महावितरणशीही चर्चा करणार असल्याचे फुलारी यांनी सांगितले