जागतिक महिला दिन: सातारा जिल्ह्यातील १४९२ ग्रामपंचायतींत महिलांची विशेष सभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:24 IST2025-03-07T15:23:59+5:302025-03-07T15:24:33+5:30
पाणी अन् स्वच्छतेसाठी झटणाऱ्या महिलेचा सन्मान

जागतिक महिला दिन: सातारा जिल्ह्यातील १४९२ ग्रामपंचायतींत महिलांची विशेष सभा
सातारा : जागतिक महिला दिन ८ मार्चला असतो. या महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील १ हजार ४९२ ग्रामपंचायती विशेष महिला सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये पाणी आणि स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या महिलांचा सन्मान होणार आहे. तसेच ग्रामपंचायतीमध्ये ‘विशेष स्वच्छता धाव’चेही आयोजन करण्यात आलेले आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने जिल्हास्तर, तालुका आणि गावस्तरावर हे कार्यक्रम होत आहेत. तर पाणी व स्वच्छता संबंधित उत्कृष्ट आणि आदर्श काम करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे.
यामधून महिलांना प्रोत्साहित केले जाईल. त्यामुळे यातून इतर महिलांनाही प्रेरणा मिळणार आहे. तसेच तालुकास्तरावर ‘हर घर जल’ घोषित गावांना राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे. यासाठीच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतील सभा होणार आहे.
यानिमित्ताने सर्व ग्रामपंचायतींमध्ये महिलांची ‘विशेष स्वच्छता धाव’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये महिला, किशोरवयीन मुली, विद्यार्थिनी, स्वच्छता कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रभावशाली लोकांचा समावेश करून पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित संदेशाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींत महिलादिनी महिलांशी विशेष सभा होणार आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होईल. पाणी आणि स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या महिलांचाही सन्मान होणार आहे. तसेच ग्रामपंचायतीमध्ये ‘विशेष स्वच्छता धाव’चेही आयोजन करण्यात आलेले आहे. -प्रज्ञा माने-भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत पाणी, स्वच्छता आणि आरोग्य याविषयी प्रोत्साहन मिळण्यासाठी ‘महिलांची विशेष धाव’चे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच गावस्तरावर महिला सभेच्या माध्यमातून पाणी व स्वच्छता आरोग्यविषयी चर्चासत्रे आयोजित केलेली आहेत. पाणी व स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या महिलांचाही सन्मान जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केला जाणार आहे. -याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी