फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना विशेष सेवा पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:55 AM2021-01-02T04:55:31+5:302021-01-02T04:55:31+5:30
फलटण : सातारा पोलीस दलातील अधिकारी, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी दिलीप बरडे यांना विशेष सेवा पदक २०२० जाहीर ...
फलटण : सातारा पोलीस दलातील अधिकारी, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी दिलीप बरडे यांना विशेष सेवा पदक २०२० जाहीर झाले आहे.
महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या निर्णयानुसार राज्य पोलीस मुख्यालय, मुंबई, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात समाधानकारक सेवा पूर्ण केलेले पोलीस अधिकारी व अंमलदार आणि १ वर्ष समाधानकारक सेवा पूर्ण केलेले राज्य राखीव पोलीस बलातील अधिकारी अंमलदार अशा राज्यातील २६ अधिकाऱ्यांना विशेष सेवा पुरस्कार २०२० जाहीर केले आहेत. त्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, मुंबईतून या विशेष सेवा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये फलटणचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या नावाचा उल्लेख पाहून फलटण व खंडाळा तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बरडे यांचे कौतुक केले. नववर्षाच्या प्रारंभी तानाजी बरडे यांना जाहीर झालेले हे विशेष सेवा पदक त्यांच्या कार्याचा सन्मान करणारे असल्याचे अनेकांनी बाेलून दाखविले.
महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झालेले उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रोबेशन पिरियड पूर्ण केल्यानंतर १२ ऑगस्ट २०१७ ते १४ ऑगस्ट २०१९ पर्यंत भाम्रागड (गडचिरोली) येथे दोन वर्षे पोलीस दलाच्या माध्यमातून समाधानकारक सेवा बजावली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून फलटण येथे रुजू झाले. फलटण, खंडाळा तालुक्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती पूर्ण नियंत्रणात ठेवण्याबरोबर गुन्हेगारी, अवैध धंदे यावर त्यांनी वचक निर्माण केला आहे.