तमाशाचा खर्च जलसंधारण कामांसाठी...
By admin | Published: April 10, 2017 09:49 PM2017-04-10T21:49:21+5:302017-04-10T21:49:21+5:30
बिचुकले ग्रामस्थांचा निर्णय : लहान ओढे-नाल्यांवर बंधारे बांधणार; यात्रा नियोजनासाठीच्या बैठकीत भूमिका स्पष्ट
वाठार स्टेशन : बिचुकले, ता. कोरेगाव येथे वार्षिक यात्रेत करमणुकीचा कार्यक्रम रद्द करून तो निधी जलसंधारणाच्या कामासाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत एकमुखाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पैशांतून लहान ओढे-नाल्यांवर बंधारे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
बिचुकले येथे ११ व १२ एप्रिलला जानुबाई देवीची यात्रा होणार आहे. या गावात गेल्या चार वर्षांपासून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याकरिता शासनाने सर्वतोपरी सहकार्य केले असून, पाणलोट विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून सव्वा कोटींची भरीव कामे झाली आहेत. गावाच्या दक्षिण व पूर्वेस डोंगर असल्याने पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यातूनच हा निर्णय घेतला आहे.
यामध्ये युवक व महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. त्यातून सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या ओढ्यावर साखळी पद्धतीने बंधारे बांधण्यात आलेत. डोंगरात दीड वर्षांपूर्वी लावलेल्या सीताफळाच्या तीनशे झाडांना यंदा फळे लागली आहेत. चिंच व डोंगरी झाडेही बहरली असून सीसीटी, माती व दगडी नालाबांध अशी अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्याकरिता चार वर्षांत जवळपास तीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. गावात वर्षभर श्रमदान व वृक्षारोपणाचा जागर सुरू असतो. त्यामुळे गेल्या वर्षी जेमतेम पाऊस पडूनदेखील यंदा पाणीपातळी टिकून असल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून उसाऐवजी कमी पाण्यात येणारी पिके घेतली जाणार आहेत. सामूहिक शेती करून भांडवली खर्चावर मात करण्यासाठी शेतकरी एकवटले आहेत.
दरम्यान, या गावची वार्षिक यात्रा होत आहे. त्याच्या नियोजनासाठी गावात बैठक झाली. यात्रेत तमाशासाठी लाखाच्या वर खर्च येतो. या पैशाची बचत करून लहान ओढे-नाल्यांवर बंधारे बांधण्याचे या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले. या कामांतून बिचकुलेकरांचा दुष्काळमुक्तीचा नारा बुलंद होणार आहे. या बैठकीला सरपंच साधना पवार, उपसरपंच अनिल पवार, रमेश पवार, शिवाजी पवार, विलास पवार, विजय पवार, संभाजी पवार, किशोर पवार, अमर पवार, संदीप पवार, मनोज पवार, सतीश पवार व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
बिचुकले, ता. कोरेगाव येथील ग्रामस्थांनी जलसंधारणाचा निर्णय एकमताने घेतला आहे.