बोलक्या अंगणवाड्या पडल्या ओस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:42 PM2017-10-05T16:42:53+5:302017-10-05T16:45:49+5:30
अंगणवाडीतार्इंनी गत काही दिवसांपासून संप सुरू केला आहे. मानधनाची रास्त व बेताची मागणी असतानाही शासन या संपाकडे गांभीर्याने पाहत नसल्याची परिस्थिती आहे. सुमारे महिनाभरापासून संप सुरू असल्याने बोलक्या अंगणवाड्या सध्या ओस पडल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
कार्वे (जि. सातारा), 5 : अंगणवाडीतार्इंनी गत काही दिवसांपासून संप सुरू केला आहे. मानधनाची रास्त व बेताची मागणी असतानाही शासन या संपाकडे गांभीर्याने पाहत नसल्याची परिस्थिती आहे. सुमारे महिनाभरापासून संप सुरू असल्याने बोलक्या अंगणवाड्या सध्या ओस पडल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी, बचट गटांच्या गत दहा महिन्यांपासून थकीत असणाºया आहाराच्या बिलांची रक्कम तातडीने द्यावी, झेरॉक्स, स्टेशनरी, आॅनलाईन अहवालावर केलेला दोन हजार रुपये खर्च द्यावा आदी प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. यापूर्वीही याच मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता.
प्रशासकीय अधिकाºयांना वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची दखल घेतली गेली नसल्याने अखेर सेविकांनी राज्यव्यापी संप पुकारला. अंगणवाडी सेविकांना ८० ते १०० रुपये एवढी रोजची हजेरी मिळते. या तूटपुंज्या मानधनावर त्यांना संसार चालवावा लागतो. एवढ्या कमी मानधनात काम करूनही सेविकांवर कामाचा ताण नेहमीच जास्त असतो. आम्ही काम करतो; पण पगारवाढ द्या, अशी सेविकांची रास्त मागणी आहे. मात्र, त्याकडे शासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अंगणवाडी तार्इंचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, त्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अंगणवाडी बंद असल्याने सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासन लक्ष देत नसल्याने दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. तसेच या संपामुळे अंगणवाड्याही ओस पडल्या आहेत. शिक्षणाचा श्रीगणेशा असलेली अंगणवाडी बंद असल्यामुळे बालकेही शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आपल्या पाल्याच्या शिक्षणाची होणारी हेळसांड पाहून पालकही अस्वस्थ झाले असून, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन हा संप मिटवावा, अशी मागणी होत आहे.