corona vaccination : दोन डोसमधील अंतरामुळं घटला वेग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 12:46 PM2021-11-19T12:46:42+5:302021-11-19T12:47:27+5:30
नितीन काळेल सातारा : कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर नागरिक वाट पाहत होते. पहाटेपासून रांगा लागायच्या. पण, गेल्या काही दिवसांत ...
नितीन काळेल
सातारा : कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर नागरिक वाट पाहत होते. पहाटेपासून रांगा लागायच्या. पण, गेल्या काही दिवसांत चित्र बदलले आहे. आता तर जिल्ह्यात लस घेणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने डोस शिल्लक राहात आहेत. यासाठी दोन्ही डोसमधील अंतर कमी करण्याची गरज आहे. तरच वेळेत लसीकरण मोहीम पूर्ण होऊ शकते. दरम्यान, आतापर्यंत १८ वर्षांवरील ८७ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात लसीकरण सुरू होते. यासाठी ४०० हून अधिक केंद्रांत सुविधा निर्माण करण्यात आली. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत होती. त्यामुळे दररोज काही केंद्रच सुरू असत. हे चित्र ऑगस्ट महिन्यापर्यंत कायम होते. पण, सप्टेंबर उजाडताच चित्र बदलले. जिल्ह्याला कोरोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे एका दिवसात लाखाच्या वर नागरिकांना डोस देण्याचा विक्रमही आरोग्य विभागाने केला आहे. त्यातच सध्या लस घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे डोस शिल्लक राहात आहेत.
जिल्ह्यात कोविशिल्ड लस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. तसेच कोवॅक्सिनचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर आहे. या डोससाठी नागरिक येतात. पण, कोविशिल्डच्या बाबत असे होत नाही. त्यामुळे दोन्ही डोसमधील अंतर कमी केल्यास लसीचे डोस शिल्लक राहणार नाहीत. तसेच लसीकरण वेगाने पूर्ण होऊ शकते.
आरोग्य कर्मचारी दिवसभर ताटकळत...
शहरी भागात लोकांत जागृती आहे, त्यामुळे लस घेण्यासाठी लोक येतात. त्यांना आपला दुसरा डोस कधी आहे याची माहिती असते. पण ग्रामीण भागात तसे होत नाही. दुसरा डोस कधी घ्यायचा हेच बहुतांश जणांना माहीत नसते. त्यातच शेतीची कामे असल्याने लोक गावाकडे फिरकतच नसतात. त्यामुळे गावात मोहीम राबवूनही फायदा होत नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना दिवस दिवस थांबून राहावे लागते.
२ लाख ९७ हजार डोस उपलब्ध...
लस आहे पण माणसे नाहीत, अशी स्थिती असल्याने डोस शिल्लक राहात आहेत. गुरुवारी आरोग्य विभागाकडे २ लाख ९७ हजार डोस उपलब्ध होते. त्यातच लस मिळण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे लस शिल्लक राहात आहे.
जिल्ह्यातील लसीकरण स्थिती
एकूण लसीचे डोस दिले - २९६४५९६
- पहिला डोस नागरिक १९९१६१८
- दुसरा डोस ९७२९७८
१८ ते ४४ वयोगटातील नागरिक
- प्रथम डोस ९५६७५१
- दुसरा डोस २९५७७९
४५ वर्षांवरील नागरिक
- पहिला डोस ९४३७९४
- दुसरा डोस ५९७०८७