‘सह्याद्री’च्या डोंगररांगातून झुकझुक-कºहाड-चिपळूण रेल्वेला गती -अर्थसंकल्पात निधीची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:25 PM2019-02-08T23:25:35+5:302019-02-08T23:27:42+5:30
संजय पाटील । कºहाड : कºहाड-चिपळूण रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर कोकण रेल्वे उर्वरित महाराष्ट्राशी जोडण्याच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने मूर्तरूप येण्याची ...
संजय पाटील ।
कºहाड : कºहाड-चिपळूण रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर कोकण रेल्वे उर्वरित महाराष्ट्राशी जोडण्याच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने मूर्तरूप येण्याची चिन्हे आहेत. त्यातच यावर्षीच्या अर्थसंकल्पातही या मार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता वाढली आहे. सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याने ही रेल्वे धावणार आहे.
कोकण रेल्वे कºहाडमार्गे उर्वरित महाराष्ट्राला जोडण्यासाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदी असताना त्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. कºहाडला रेल्वेचे जंक्शन करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. मात्र, दरवर्षीच्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात कºहाड-चिपळूण रेल्वे मार्गाबाबत निराशा होत होती. मागणी करूनही या मार्गाला मंजुरी मिळत नव्हती. सुमारे तीन वर्षांपूर्वी या मार्गासाठीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही.
प्रक्रिया धिम्यागतीने सुरू असताना कोणताच ठोस निर्णय होत नव्हता. अखेर यावर्षीच्या अर्थसंकल्पात कºहाड-चिपळूण रेल्वे मार्गाला हिरवा कंदील मिळाला. सुमारे ११२ किलोमीटरच्या या मार्गासाठी निधीची तरतूदही करण्यात आली. त्यामुळे काही अवधीतच या रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्वेक्षण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.
कºहाड-चिपळूण लोहमार्गामुळे कोकण भाग उर्वरित महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे; पण त्याचबरोबर याचा सर्वात जास्त फायदा कºहाडला होणार आहे. घाटमाथ्यावर प्रस्तावित असलेल्या औद्योगिक वसाहतीलाही त्यामुळे चालना मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या कºहाड विमानतळाच्या विस्तारीकरण व गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. विमानतळ, चौपदरी होत असलेला महामार्ग आणि कºहाड-चिपळूण हा नवा रेल्वे मार्ग हे सर्व कºहाडचे महत्त्व वाढविण्यास हातभार लावणार आहेत.
९० गावे, १० रेल्वे स्थानके
कºहाड-चिपळूण हा मार्ग ९० गावांमधून जाणार असून, रेल्वेमार्गावर १० रेल्वे स्थानके होणार आहेत. कºहाडनंतर साकुर्डी, मल्हारपेठ, नाडे, पाटण, कोयनारोड, मुंढे, खेर्डी, चिपळूण आदी रेल्वे स्थानके होणार आहेत.
सप्टेंबर २०१३ पासून सर्वेक्षण
रेल्वे मार्गामुळे कोल्हापूरसह पुणेही रत्नागिरीच्या जवळ येणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी प्रयत्न केले असून, रेल्वे बोर्डानेही अन्य पर्यायी मार्गापेक्षा चिपळूण-कºहाड हाच रेल्वे मार्ग सोयीचा असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे सप्टेंबर २०१३ मध्ये चिपळूण येथून या मार्गाच्या सर्वेक्षणाला युद्धपातळीवर सुरुवात झाली.
दळणवळणास येणार गती
कºहाड-चिपळूण या नवीन रेल्वे मार्गामुळे व्यापाराची वृद्धी होईल, असे जाणकारांनी सांगितले. तसेच या मार्गामुळे कोकणातील दळणवळण सोपे होण्यास मदत होणार आहे. या नवीन रेल्वेमार्गामुळे कºहाड तसेच सातारा जिल्ह्याच्या पूर्वेच्या गावातील नोकरी धंद्यानिमित्त कोकणात असणाºया कामगारांना याचा चांगला फायदा होणार आहे.
कºहाड आणि चिपळूण जंक्शन
रेल्वेमार्ग प्रत्यक्षात साकार झाल्यानंतर चिपळूणसह कºहाड रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. हा मार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जाणाºया प्रत्येक गाडीला येथे हमखास थांबा मिळेल. पर्यायाने कोकणातील एक मध्यवर्ती केंद्र म्हणून चिपळूणचा तर दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर म्हणून कºहाडचा झपाट्याने विकास होईल.
कमी खर्च आणि
जास्त फायदा
चिपळूण-कºहाड, रत्नागिरी-कोल्हापूर, राजापूर-कोल्हापूर, सावंतवाडी-कोल्हापूर अशा विविध मार्गांचा मागण्यांमध्ये समावेश होता. मात्र, कमी खर्च आणि जास्त फायदा असल्याने कºहाड-चिपळूण मार्गाला शासनाकडून मंजुरी देण्यात आली.
रोजगाराच्या संधी उपलब्ध
पर्यटनानिमित्त कोकणात जाणाºया पर्यटकांची संख्या वाढण्यासही मदत होणार आहे. शेतकरी, लहान उद्योजकांनाही कºहाड-ढेबेवाडी या नवीन रेल्वे महामार्गामुळे मोठा फायदा होणार आहे. दळणवळ, व्यापार, व्यवसाय वाढीमुळे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
सात कि.मी.चा बोगदा
मार्गावर लहान-मोठे एकूण १९ बोगदे असून, यापैकी कुंभार्ली घाटातील बोगदा सात किलोमीटर लांबीचा असणार आहे. कोरे मार्गावर करबुडे हा बोगदा साडेसहा किलोमीटर लांबीचा असून, याच्या तुलनेत कºहाड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटातील हा बोगदा मोठा असणार आहे.
९२८.१० कोटी अपेक्षित खर्च
नियोजित कºहाड-चिपळूण हा मार्ग हा सुमारे १०४ किलोमीटर लांबीचा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच २०१३ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात या मार्गासाठी सुमारे ९२८.१० कोटींचा खर्च अपेक्षित होता. त्यानंतर मंजुरी देतानाच १२०० कोटींची तरतूद करण्यात आली होती.