वाहनांचा वेग ठरतोय वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:11+5:302021-06-24T04:26:11+5:30
पेट्री : सातारा-कास-बामणोली मार्गावर वन्यजीवांचा अधिवास आहे. काही भाग वगळता या मार्गावर रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण पूर्ण झाल्याने ...
पेट्री : सातारा-कास-बामणोली मार्गावर वन्यजीवांचा अधिवास आहे. काही भाग वगळता या मार्गावर रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण पूर्ण झाल्याने वाहने सुसाट धावत आहेत. मात्र, वाहनांचा हा वेग वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरू लागला आहे. भरधाव वाहनांच्या धडकेत वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत तर अनेक सरपटणाऱ्या जिवांनाही प्राण गमवावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वेगावर कुठेतरी मर्यादा ठेवणे गरजेचे बनले आहे.
कास मार्गावरील यवतेश्वर घाटात वानरांची ये-जा सुरू असते. घाटातून साताऱ्याकडे तीव्र उतारावर काहीजण वाहनांना आऊटऑफ मारतात. त्यामुळे एखादा वन्यजीव समोर आल्यास वाहनावर नियंत्रण ठेवणे अवघड होते. कास-बामणोली मार्गावरही अनेकदा वन्यजीव मुख्य रस्ता ओलांडताना पहावयास मिळतात. पावसाची रिपरिप, दाट धुके, घाटरस्ता, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाच्या मार्गामुळे रात्री तसेच दिवसादेखील अंदाज न आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
अनेक वन्यजीव अन्न, पाण्याच्या शोधार्थ इकडून तिकडे भ्रमंती करतात. स्टंट, हुल्लडबाजी करून वाहन चालवणाऱ्यांकडून या मार्गावरील वन्यजीवांना धोका उद्भवत आहे. साप, सरडा, बेडूक असे कित्येक प्राणी वाहनांच्या चाकाखाली चिरडून ठार होत आहेत. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा. वाहनधारकांनी यासाठी वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवणे गरजेचे आहे.
(कोट)
सातारा-कास-बामणोली या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. काही तरुण या मार्गावर स्टंट करतात. वेगाने गाडी चालविणाऱ्यांची देखील कमी नाही. त्यामुळे अनेक सरपटणारे जीव चाकाखाली चिरडत आहेत. मुक्या प्राण्यांचे रक्षण करणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. वाहनधारकांनीदेखील ही जबाबदारी ओळखावी.
- प्रदीप शिंदे, कासपठार कार्यकारी समिती, कर्मचारी
(चौकट)
सातारा-बामणोली मार्गावर नेहमीच वन्यजीवांचा मुक्तसंचार असतो. भेकर, रानडुक्कर, रानगवे, ससे, रानकोंबड्या, साळींदर, मोर, घोरपड, अन्य सरपटणारे प्राणी निर्भीडपणे रस्त्याच्या एकाबाजूकडून दुसऱ्या बाजूकडे संचार करत असतात. हे वन्यप्राणी सह्याद्रीचे वैशिष्ट्य आहेत. पशूपक्षी व त्यांचा अधिवास सुरक्षित रहावा, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा पर्यावरणपेमींमधून व्यक्त होत आहे.
फोटो : २३ सागर चव्हाण
सातारा-कास मार्गावर गणेशखिंड परिसरात वाहनाखाली घोणस जातीचा सर्प चिरडला गेला. (छाया : सागर चव्हाण)