तहसीलदारांच्या भेटीनंतर कामाला गती
By admin | Published: June 29, 2015 10:37 PM2015-06-29T22:37:28+5:302015-06-30T00:20:36+5:30
परळी परिसर : अनेक दिवसांपासून गावे अंधारात; वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
परळी : सतत पाऊस पडत असताना परळी, ठोसेघर परिसरातील अनेक गावे अंधारात होती. लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. बोंडारवाडी गावामध्ये तर पंधरा दिवस वीज गायब होती अन् त्यातच गावावर माळीणसारखी परिस्थिती ओढवली होती. या घटनांची दखल घेऊन तहसीलदार राजेश चव्हाण व परळी मंडलाधिकारी संजय बैलकर यांनी परळी वीजवितरण कंपनीच्या कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर परळी खोऱ्यातील सर्व ठिकाणच्या वीज दुरुस्तीच्या कामांना वेगाने सुरुवात झाली.
गेल्या आठ दिवसांपासून सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत होता. आता तीन दिवस झाले पावसाने विश्रांती घेतली आहे. परळी, ठोसेघर परिसरातील अनेक गावे अंधारात होती. जोरदार पावसामुळे बोंडारवाडी गावावर माळीणसारखी परिस्थिती निर्माण झाली असताना तहसीलदार चव्हाण, परळी मंडलाधिकारी बैलकर आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावास भेटी दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी वीजवितरण कंपनीच्या कारभाराविषयी गाऱ्हाणी मांडली.
डोंगर भागात अनेक ठिकाणी विजेचे पोल वाकले आहेत. वीजतारांना झाडांच्या फांद्या घासत आहेत. हे तहसीलदार चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे त्यांनी परळी वीजवितरण कार्यालयास भेट दिली असता कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. अधिकारी जागेवरच नव्हते. साहेब कुठे गेले आहेत हे कर्मचाऱ्यांना सांगता येत नव्हते. तहसीलदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना फोन करून धारेवर धरल्याने ‘दोन दिवसांत काम पूर्ण करतो,’ असे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी बोंडारवाडीसह ठोसेघर पठारावरील पांगारे, बोरणे, राजापुरी या गावांतील विजेची कामे केली. (वार्ताहर)
उन्हाळ्यातील कामे पावसाळ्यात...
परळी खोऱ्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या तारांना झाडाच्या फांद्या घासत आहेत. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये किंवा तारा तुटू नये म्हणून या फांद्या तोडण्याचे काम पावसापूर्वी उन्हाळ्यात करायचे असते; परंतु ती कामे पाऊस सुरू झाल्यानंतर करायला सुरुवात करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर चार-चार दिवस लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली असते.
डीपी बॉक्स उघडेच
ठोसेघर पसिरासह अनेक गावे डोंगरात आहेत, त्या गावांना वीजपुरवठा करणारे डीपी बॉक्स उघडेच आहेत. बॉक्सचे पोल गंजले आहेत. डीपी उघडा असल्याने अनूचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.