मसाला उतरला काढ्यात; दरही वाढला झटक्यात.!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:44 AM2021-08-21T04:44:18+5:302021-08-21T04:44:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना आला आणि मसाल्याचा वापर औषध म्हणून काढ्याच्या रूपाने होऊ लागला. त्यातच सध्या वाहतूक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना आला आणि मसाल्याचा वापर औषध म्हणून काढ्याच्या रूपाने होऊ लागला. त्यातच सध्या वाहतूक खर्च वाढणे, उत्पादन कमी राहणे आदी कारणाने मसाला दरात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे जेवणाची चवही महागली आहे.
मागील सव्वा वर्षापासून कोरोना विषाणूचं संकट आहे. यामुळे विविध साहित्यांचे दर वाढले आहेत. पालेभाज्याही भाव खाऊ लागल्यात. याच काळात मसाल्याचा काढा करून तयार होणारे औषध पिण्याचा प्रकार पुढे आला. त्यासाठी घरात असणाऱ्या विविध मसाल्यांचा वापर करण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर घरात स्वयंपाकासाठी मसाले हे महत्त्वाचेच ठरतात; पण आता हेच मसाले दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या घरातील चवही महाग करत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच येत्या काही दिवसांत गौरी, गणपती, नवरात्रौत्सव, दिवाळी हे सण येत आहेत. त्यामुळे मसाल्याच्या किमती आणखी वाढू शकतात.
.........................
असे वाढले दर...
जुने दर नवे दर
रामपत्री ९०० ९००
बदामफूल ८०० १२००
जिरे १६० १६०
काळी मिरी ४२० ५४०
नाकेश्वरी १२०० १८००
जायपत्री २००० २३००
मोहरी ६० ८०
तमालपत्री ६५ ६५
लवंग ४५० ७००
.....................................
महागाई पाठ सोडेना...
मसाल्याकडे औषध गुणधर्म म्हणून पाहिले जाते. या मसाल्यांचा वापर स्वयंपाकात करावाच लागतो. त्याशिवाय जेवण रुचकर होत नाही. त्यातच सणांच्या काळात मसाल्याचा वापर अधिक होतो; पण गेल्या काही दिवसांत मसाल्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे कोरोना काळात वाढलेली महागाई पाठ काय सोडेना? अशी स्थिती आहे.
- पुष्पा पाटील, गृहिणी .
.............................................
कोरोनाचे संकट असल्याने आजही मसाल्यांचा काढा घेण्याचे प्रमाण आहे. खाण्याचे पदार्थ बनविण्यासाठीही मसाले लागतात; पण सध्या मसाल्याचे दर वाढले आहेत. यामुळे स्वयंपाकाची चवच कमी झाली आहे. येणाऱ्या काळात सण अधिक आहेत. त्यामुळे मसाल्यांची मागणी वाढून आणखी दर वाढणार आहेत.
- सरोज नरळे, गृहिणी.
....................................................
म्हणून वाढले मसाल्याचे दर...
मसाल्याचे पदार्थ अनेक राज्यात पिकवले जातात. तेथून आयात करण्यात येते. तेथे उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. तसेच इंधन दरवाढ झाल्याने वाहतूक खर्चही वाढला आहे. परिणामी, गेल्या काही महिन्यांत अनेक मसाल्यांचे दर वाढलेले आहेत.
- मोहसीन बागवान, आर.एम. ट्रेडर्स, सातारा.
............................................
मसाल्यांचा वापर स्वयंपाकासाठी होतो; पण गेल्या वर्षभरात कोरोनामुळे औषध काढा म्हणून मसाल्यांना मागणी वाढली. त्यातच बाहेरून येणारे मसाल्यांची आयात कमी झाल्याने दरावर परिणाम झाला आहे.
- शांताराम पवार, दुकानदार .
..............................................................