‘योगयुक्त-रोगमुक्त-स्वस्थ चित्त कुटुंब अभियान’ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:45+5:302021-07-01T04:26:45+5:30
सातारा : कुटुंब संस्थेचे सबलीकरण, सशक्तीकरण, संवर्धन व जतन व्हावे, यादृष्टीने पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत कुटुंब प्रबोधन गतिविधीमार्फत ‘आंतरराष्ट्रीय योग ...
सातारा : कुटुंब संस्थेचे सबलीकरण, सशक्तीकरण, संवर्धन व जतन व्हावे, यादृष्टीने पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत कुटुंब प्रबोधन गतिविधीमार्फत ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाचे’ औचित्य साधत एक लाख कुटुंबात योग साधना प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ‘योगयुक्त-रोगमुक्त-स्वस्थचित्त कुटुंब अभियान’ साताऱ्यात उत्साहात पार पडल्याची माहिती संघ प्रचार विभागप्रमुख महेश शिवदे यांनी दिली.
कुटुंब, आरोग्य व व्यायाम या त्रिसूत्रीचे महत्त्व कोविड काळात पुन्हा एकदा अनेकांना पटले आहे. त्यावर अनेकांनी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक काम करण्याचे निश्चित केले. ‘कुटुंब संस्था व योग साधना’ या दोन्ही गोष्टी आपल्या प्राचीन संस्कृतीची प्रतिके आहेत. मानसिक व शारीरिक स्तरावरील आरोग्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने या त्रिसूत्रीचे संवर्धन व जतन हे प्रत्येक कुटुंबात होणे गरजेचे असल्याचे अभियानात स्पष्ट करण्यात आले.
अभियानाला समाजातील सर्वच स्तरातील घटकांनी, संघटनांनी प्रतिसाद दिला. योगा शिकवू शकणाऱ्या व किमान २५ कुटुंबांची नोंदणी करणाऱ्या गटप्रमुखांची नोंदणी करण्यात आली. सर्व गटप्रमुखांचे प्रशिक्षण ७० योगशिक्षकांच्या गटामार्फत करण्यात आले. यामुळे गटप्रमुख अधिक आत्मविश्वासाने अभियानात आपआपल्या गटांचे संचालन केले. यात ४ हजार ५९७ गटप्रमुखांनी आपली नोंदणी केली. समाजातील दुर्लक्षित व काहीअंशी बहिष्कृत असा वाघ्यामुरळी समाजही यात सामील झाला.
गटप्रमुखांनी योग सप्ताहासाठी मंदार गायकवाड यांनी तयार केलेल्या विशेष चित्रफितीद्वारे कुटुंबांकडून योगाभ्यास करवून घेतला. योग सप्ताहानिमित्त विशेष ‘योग गीत’ मिथाली लोहार यांनी गायिले.