‘थुंकू नये’ फलकच बनले लालभडक !

By Admin | Published: February 5, 2016 10:53 PM2016-02-05T22:53:38+5:302016-02-05T23:55:39+5:30

सार्वजनिक ठिकाणचे कोपरे रंगले : म्हणे ‘कायदेशीर कारवाई करणार’.. पण कोण करणार अन् काय करणार ?--लोकमत सर्वेक्षण

The 'spit-less' plank became reddish! | ‘थुंकू नये’ फलकच बनले लालभडक !

‘थुंकू नये’ फलकच बनले लालभडक !

googlenewsNext

सातारा : ‘थुंकू नये!’ असे ठळक लिहिलेल्या फलकावरच थुंकण्यात तब्बल १६ टक्के सातारकरांना मनापासून आवडते. विशेष म्हणजे बसमध्ये खिडकीतून तोंड बाहेर काढण्याऐवजी आतील भागाच रंगविण्यात १७ टक्के प्रवाशी धन्य मानतात... ही धक्कादायक आकडेवारी हाती आली आहे ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात!
थुंकाल तर सफाईची शिक्षा, असा नवा कायदा आणण्यासाठी शासन हालचाली करत आहे. या पार्श्वभूमीवर पान, तंबाखू किंवा तत्सम पदार्थ सेवन करणाऱ्या व्यसनी नागरिकांच्या थुंकण्याच्या जागेबाबत ‘लोकमत टीम’ने सर्वेक्षण केले. दिवसभर सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे घेऊन छायाचित्रकार वॉच ठेवून होते. या सर्वेक्षणात हाती आलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती.
थुंकणाऱ्यांपैकी ४३ टक्के नागरिक रस्त्यावर कोठेही थुंकण्यास उत्सुक होते, तर २४ टक्के लोकांना कोपऱ्यात जावून थुंकणे, सभ्यपणाचे वाटत होते. १६ टक्के मंडळींना मात्र ‘थुंकू नये’ या फलकाखालीच थुंकण्यामध्ये कोणतीही लाजलज्जा वाटत नसल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. १७ टक्के प्रवाशांना बसमध्येच पिचकारी मारण्यात अधिक आनंद वाटत होता.
‘येथे थुंकू नये,’ अशा पाट्या ठिकठिकाणी दिसत असल्या तरी थुंकणारे नेमके तिथेच थुंकतात हा अनुभव आहे. मोकळ्या जागेत तर ते थुंकतातच; शिवाय इमारतींच्या जिन्यात थुंकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ते रोखण्यासाठी दंडाची धमकी, कारवाईचा इशारा असे अनेक उपाय राबविले गेले असले तरी सातत्याने लक्ष ठेवणार कोण, या मर्यादेमुळे कारवाई फारशी झालेली नाही.
शहरातील काही अपार्टमेन्टमध्ये अखेर देवादिकांची चित्रे असलेल्या टाइल्स जिन्यात बसविण्याची कल्पना राबविली गेली. या अफलातून उपायामुळे मात्र थुंकणाऱ्यांवर बऱ्यापैकी नियंत्रण आल्याचे दिसून आले. (लोकमत चमू)


दर शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारीच पुसतात डाग
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवाराची दर शनिवारी स्वच्छता केली जात आहे. शासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर सफाईची शिक्षा करण्याचा कायदा करण्याची घोषणा केली असली, तरी आरोग्य विभागाने आधीच उपाययोजना हाती घेतली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी याबाबत माहिती देताना सांगितले. दर शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्रांत आठवड्याची मिटिंग घेतली जाते. या मिटिंगनंतर सर्व कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती व बाहेरच्या परिसरात झाडू हातात घेऊन स्वच्छता मोहीम राबवितात. आरोग्य विभागाचा हाच आदर्श इतर विभागांनी घेतल्यास शासकीय कार्यालये व बाजूचा परिसर नेहमी स्वच्छ राहू शकतो.


थुंकी बहाद्दरांना अडविणार कोण? पोलीस की कर्मचारी...
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालणारा कायदा करण्यात आला तरी त्याची अंमलबजावणी पोलीस करणार की स्थानिक स्वराज्य संस्था, हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. काही ठिकाणी पालिकांनी थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचे ठेके दिले आहेत, तर काही ठिकाणी एसटी महामंडळाने बसस्थानक परिसरात थुंकणाऱ्यांकडून दंडवसुलीसाठी ठेकेदार नेमले आहेत. सध्या तरी प्रत्येक अस्थापनाकडून आपापल्या कारवाया सुरू असल्याचे दिसते. ‘थुंकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असे फलक लावलेले असले तरी ती कारवाई नेमकी कोणती, हे दंड वसूल करणाऱ्यांवरच अवलंबून आहे. नव्या कायद्यान्वये यात सुसूत्रता येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


केवळ फलक लावून
पालिकेला प्रतीक्षा जनजागृतीची
सार्वजनिक ठिकाणी थुंकताना सापडल्यास त्याला सफाईची शिक्षा ठोठवावी, अशी कायद्यात तरतूद करण्यासाठी शासनाने हालचाली केल्यानंतर सातारा पालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी फलक लावून लोकांमध्ये जागृती केली जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती थुंकताना सापडल्यास त्याला काहीच बोलता येत नाही. चुकून एखाद्याने त्याला सुनावल्यास वादावादीचे प्रसंग घडतात. त्यामुळे अशाप्रकारे वर्तन करणाऱ्या नागरिकांकडे लोक दुर्लक्षच करतात. परंतु अशा लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आत्तापासूनच सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत. हा कायदा झाल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. मात्र तोपर्यंत लोकांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: The 'spit-less' plank became reddish!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.