‘शिवसंग्राम’ संघटनेत फूट; ‘स्वराज्य संग्राम’ची घोषणा, पंढरपूरला पहिले अधिवेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 12:29 PM2024-09-02T12:29:53+5:302024-09-02T12:30:31+5:30
मेटे कुटुंबीयांनी संघटना वाटून घेतल्याचा प्रदेशाध्यक्षांचा आरोप
कऱ्हाड (जि. सातारा) : ‘माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर गेली दोन वर्षे शिवसंग्राम संघटना मी टिकवून ठेवली. मात्र, सध्या मेटे कुटुंबीयांनी संघटना वाटून घेतली आहे. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना आता मी वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यामुळेच नवी संघटना स्थापन करत आहे,’ असे सांगून शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी त्यांच्या ‘स्वराज्य संग्राम’ या नव्या संघटनेची घोषणा केली.
कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी अजितराव बानगुडे आणि अनंतराव देशमुख यांची संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी, तर विक्रांत आम्रे यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पंढरपूरला पहिले अधिवेशन
स्वराज्य संग्राम संघटनेचे पहिले अधिवेशन पंढरपूर येथे होणार आहे. १५ सप्टेंबर रोजी हे अधिवेशन होणार असून, त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते दाखल होणार आहेत. या अधिवेशनामध्ये संघटनेची पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याचेही तानाजीराव साळुंखे यांनी यावेळी सांगितले.