पसरलेल्या लोकवस्तीचे ‘पसरणी’ गाव
By Admin | Published: March 23, 2015 10:47 PM2015-03-23T22:47:37+5:302015-03-24T00:19:29+5:30
ऐतिहासिक परंपरा : गावकरी जपतायत धार्मिक सलोखा--नावामागची कहाणी-पंधरा
संजीव वरे - वाई सह्याद्रीच्या कुशीत घनदाट वनराईत अनेक छोटी-छोटी गावं वसली आहेत. पूर्वी डोंगररांगांच्या पायथ्याला असलेल्या जंगलात मोकळ्या जागेत शेती करून लोक शेताजवळ वस्ती करून राहू लागले. जागा मिळेल तिथे चार-दोन घरांची वस्ती निर्माण झाली. पसरून पसरून असणाऱ्या लोकवस्तीमुळं ‘पसरणी’ गावाची निर्मिती झाली. लोकवस्तीच्या आजूबाजूला असलेल्या जंगलात गायरानं होती. गुराखी गुरं चरायला नेत. दगडी बारवातलं पाणी पिऊन जनावरं वनराईत विश्रांतीसाठी पसरत. यावरूनही लोकवस्तीला ‘पसरणी’ नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा परिसर. वाईहून पांचगणी-महाबळेश्वरला जाताना सह्याद्रीच्या डोंगररांगेत नागमोडी वळणाच्या घाटाला ‘पसरणी घाट’ असे नाव आहे. डोंगराच्या पायथ्याला व कृष्णा नदीच्या तीरावर येथील बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतात वस्ती करून राहिल्याने व ही वस्ती पसरून असल्याने गावचे नाव पसरणी पडले आहे. हे गाव शाहू महाराजांनी सातारचा किल्लेदार शेखमिरा याला इनाम दिले होते. पूर्वी येथे ‘नवाबवाडा’ प्रसिद्ध होता. या वाड्यात त्याकाळी हत्ती झुलायचे. ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. येथील यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात.येथील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. याठिकाणी कृष्णा नदीचे पात्र दक्षिणेकडे वाहते. गावात जुन्या काळातील बारव आहे. या गावी शाहीर साबळे, क्रांतिवीर नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, सेनापती बापट यांच्या उपस्थितीत अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. दसऱ्याला भैरवनाथाची पालखी निघते. यावेळी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी असे साहसी खेळ खेळले जातात.
कीर्तिवंतांचं गाव
पसरणी गावात महराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के, बँकिंग क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ गजानन दाहोत्रे, साहित्यिक, स्वातंत्र्यसेनानी जन्माला आले. त्यांनी गावची कीर्ती सर्वदूर पोहोचविली आहे. शाहीर साबळे, बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात ‘पद्मश्रीं’चे गाव म्हणूनही पसरणीची ओळख निर्माण झाली आहे.
पसरणीच्या चामडी बुटांची ब्रिटिशांना भुरळ
पसरणीची रेशमी ‘साळवी लुगडी’ प्रसिद्ध होती. इंग्रज राजवटीत गव्हर्नर साहेबांना येथील चर्मकारांनी बनविलेल्या बुटांनी भुरळ पाडलेली. म्हणून ते येथील चामडी बूट इंग्लंडला घेऊन जायचे. आजही महाबळेश्वरमध्ये काही चर्मकार बांधव कातडी चपला, बूट बनविण्याचा व्यवसाय करतात.