वसनेच्या उगमस्थानी कलेचा झरा!

By admin | Published: September 23, 2015 10:16 PM2015-09-23T22:16:10+5:302015-09-24T00:08:41+5:30

कोरेगाव तालुका : सोळशीकरांनी जोपासलीय पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची परंपरा

Spring spring! | वसनेच्या उगमस्थानी कलेचा झरा!

वसनेच्या उगमस्थानी कलेचा झरा!

Next

वाठार स्टेशन : सोळशी या गावाने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची परंपरा कायम जपली आहे. येथील मूर्ती केवळ चार दिवसांत बनविण्यात आली आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील सोळशी हे ऐतिहासिक गाव आहे. खंडाळा, वाई व कोरेगाव यांच्या सीमारेषेवर वसना नदीच्या उगमस्थानी व हरेश्वर डोंगराच्या पायथ्याला वसलेलं छोटंस गाव. याच डोंगर परिसरात सोळा शिवलिंगांचं सान्निध्य असल्याने या गावाचं नाव सोळशी असे पडल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थ सांगतात.
सोळशी भूमीत पांडवांचे वास्तव्य असल्याचाही इतिहास आहे. याशिवाय ब्रिटिशांची छावणीही याच गाव परिसरात असल्याने अजूनही याठिकाणी या काळातील तोफगोळे सापडत आहेत.शुद्ध शाकाहारी गाव म्हणूनही या गावाची वेगळी ओळख सांगितली जाते. गावात हरेश्वर, शूळ पानेश्वर, विठ्ठल रखुमाई आणि ग्रामदैवत भैरवनाथ-जोगूबाईची हेमाडपंथीय मंदिरे आहेत.या इतिहासाला साजेशे काम सोळशी ग्रामस्थ शेकडो वर्षांपासून करीत आहेत. गावच्या गणेशोत्सवाला वेगळी ओळख आहे. या गावात शेकडो वर्षांपाासून पर्यावरण पूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी संपूर्ण गावाला लागणाऱ्या गणेशाच्या मूर्ती गावचा सोनार बनवतो. काळ्या मातीपासून कोणत्याही प्रकारच्या रंगविरहीत अशा मूर्ती बनवून याच मूर्ती ग्रामस्थांकडून घरोघरी बसवल्या जातात. गावात सर्वाधिक प्रमाणात यादव व सोळस्कर या आडनावाची लोकसंख्या जास्त आहे. यादव म्हणजे यदूवंशी भगवान श्रीकृष्णाचे मूळ पुरुष. असे असतानाही याच श्रीकृष्णाचे कोणतेही मंदिर नसल्याची नोंद आहे.सोळशी आज शनैश्वर देवस्थानमुळे नावारुपास आले आहे. ‘क’ दर्जा प्राप्त आयएसओ मानांकन असलेले हे देवस्थानही सोळशी ग्रामस्थांसाठी अभिमानाची गोष्ट बनले आहे. सोळशी गावातील या पर्यावरण पूरक गणेशाची परंपरा यापुढेही चालूच राहणार आहे, असे येथील ग्रामस्थांना सांगितले जात आहे. (वार्ताहर)

सोळशी गावात पूर्वांपार चालत आलेली गणेशोत्सवाची परंपरा या पुढील काळातही जोपासण्याचे काम आजची पिढी करेल. सद्य:स्थितीत काही मानाच्या लोकांकडेच या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बसविण्यात येतात. भविष्यात संपूर्ण गावात व गावातील सार्वजनिक मंडळांनाही अशा मूर्ती बसविण्याबाबत आम्ही भूमिका घेणार आहोत.
- संतोष यादव

Web Title: Spring spring!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.