कऱ्हाड निर्मलसाठी आता पथकाचा वॉच !
By admin | Published: May 22, 2017 11:17 PM2017-05-22T23:17:41+5:302017-05-22T23:17:41+5:30
कऱ्हाड निर्मलसाठी आता पथकाचा वॉच !
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : कऱ्हाड शहर निर्मल करण्यासाठी व शहरात वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी कऱ्हाड येथे शहर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. याअनुषंगाने पालिकेत सहा पथकांची स्थापना करण्यात आली असून, शहर निर्मलसाठी पथकांकडून दुर्गंधी करणाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. पथकांच्या स्थापनेबरोबरच फलकांद्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे काम केले जात आहे.
स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी पालिकेने शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेचे फलक लावले आहेत. शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याची पालिकेने नुकतीच घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने तशा उपाययोजनांचीही अंमलबजावणी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेत सहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
या पथकातील कर्मचाऱ्यांकडून दहा ठिकाणी वॉच ठेवला जाणार आहे. यामध्ये बाराडबरी व सूर्यवंशी मळा परिसर, श्री हॉस्पिटल परिसर झोपडपट्टी, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम व ईदगाह मैदान परिसर, सोमवार पेठ व वीटभट्टी परिसर, कमळेश्वर मंदिर व स्मशानभूमी परिसर, रणजीत टॉवर परिसर अशा दहा ठिकाणी पालिकेतील पथकाकडून कारवाई करण्यात येणार
आहे.
पथकाबरोबरच शहरातील प्रत्येक मुख्य चौकात व प्रभागात स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे व अस्वच्छता केल्यास करण्यात येणारा दंड या सूचनांचे फलकही लावण्यात आले आहेत.
कऱ्हाडमध्ये कोठेही उघड्यावर शौचास बसण्यास मनाई आहे. उघड्यावर शौचास बसल्यास पाचशे रुपये दंडाची आकारणी करून संबंधित व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सूचनांचे तसेच शहरात दररोज रस्त्यावर व कचराकुंडीत पडणाऱ्या कचऱ्यांबाबतही कर्मचारी व नागरिकांमध्ये कचरा विभागाजनाबाबत माहिती व्हावी म्हणून ‘थांबा आपला कचरा एकत्र मिसळू नका’ अशा ओला व सुका कचरा वर्गीकरण अशा सूचनांचे फलक पालिका आवारात व शहरातील मुख्य ठिकाणी लावण्यात आले आहेत.
शहर स्वच्छतेबाबत पालिका प्रशासन आता गंभीर झाले असून, त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत.
संबंधित पथक काय कारवाई कारणार...
पालिकेच्या सहा पथकाच्याकडून शहरातील ठरवून दिलेल्या दहा ठिकाणी दररोज पहाटे पाच ते साडेआठ या वेळेत भेट दिली जाणार आहे. त्या ठिकाणी पाहणी करीत असताना कोणी नियमांचा भंग करताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक तसेच कायदेशीर करवाई करणार आहे. नागरिकांना देण्यात आलेल्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाच्या वापराबाबत मार्गदर्शन या पथकाकडून केले जाणार आहे.
तक्रार निवारणासाठी ‘टोल फ्री क्रमांक’...
कऱ्हाड शहरात दुर्गंधी पसरविणाऱ्याबाबत तसेच उघड्यावर शौचास बसणाऱ्याची माहिती देण्यासाठी व तक्रार करण्यासाठी कऱ्हाड पालिकेचा टोल फ्री क्रमांक चोवीस तास कार्यरत आहे. पालिकेच्या १८००२३३५३१६ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास तत्काळ पालिकेकडून समस्या तसेच तक्रारींची दखल घेतली जाणार आहे.
प्रभागात घंटागाडीचे वेळापत्रक...
पालिकेची घंटागाडी कचरा एकत्रित करण्यासाठी येण्याची वेळ ही नागरिकांना माहिती होण्यासाठी पालिकेकडून प्रत्येक प्रभागामध्ये घंटागाडीचे वेळापत्रक फलक तयार करून लावण्यात आलेले आहे. त्यावर वॉर्डमधील कचरा एकत्रित करण्याची ठिकाणे, वेळ, संपर्क क्रमांक, घंटागाडीवरील मुकादम, वॉर्ड मुकादम, ठेकेदार, आरोग्य निरीक्षक यांचे संपर्क क्रमांक टाकण्यात आलेले आहेत.
पालिकेचे वरातीमागून घोडे...
कऱ्हाड शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा पालिकेतील लोकप्रतिनिधींच्या संमतीने प्रशासनाने नुकतीच केली. त्यानंतर आता उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथकाची स्थापना के ली आहे. वास्तविक, अगोदर कारवाई करून लोकांना तशा सूचना करून निर्मल व हागणदारीमुक्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. आता पथक स्थापन करून पालिकेने वरातीमागून घोडे नाचविल्यासारखे झाले, अशी चर्चा आहे.