श्रीमंती भपक्याने झाकोळला स्वार्थत्याग!
By Admin | Published: March 2, 2015 09:43 PM2015-03-02T21:43:56+5:302015-03-03T00:34:05+5:30
माधव गाडगीळ यांची खंत : ज्ञानाची मक्तेदारी मोडणारा ‘अर्धा माणूस’ आधुनिक अर्थतज्ज्ञांकडून दुर्लक्षित
सातारा : ‘स्वार्थाची उपजत प्रवृत्ती हाच मानवी प्रगतीचा एकमेव आधार आहे, हे आधुनिक अर्थतज्ज्ञांचे प्रतिपादन अधुरे आहे. जनुकीयदृष्ट्या स्वार्थाबरोबरच स्वार्थत्याग हीसुद्धा उपजत मानवी प्रवृत्ती असून, स्वार्थासाठी ज्ञानावर मक्तेदारी प्रस्थापित करण्याचा मूठभरांचा प्रयत्न स्वार्थत्याग करणाऱ्यांनी नेहमीच उधळला आहे. श्रीमंती भपक्याने असे प्रयत्न झाकोळण्याचा प्रयत्न अर्थतज्ज्ञांकडून होत असला तरी ज्ञान आणि सत्य लपणार नाही,’ अशा शब्दांत ज्येष्ठ परिसरविज्ञान तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी अर्थशास्त्राच्या एकांगी मांडणीवर थेट प्रहार केला.
मराठी पंधरवड्यानिमित्त मराठी साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि सातारा पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ह्या नच मुंग्या; हीच माणसे’ या विषयावर डॉ. गाडगीळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन शाहू कला मंदिरात करण्यात आले होते. ‘वारूळपुराण’ या मुंग्यांवर आधारित आपल्या नव्या पुस्तकामागील प्रेरणेपासून सुरुवात करून डॉ. गाडगीळ यांनी उत्क्रांतीवाद, समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणाच्या क्षेत्रात आपल्या नेमस्त परंतु ठाम भूमिकेतून सुमारे सव्वा तास मुक्त मुशाफिरी केली. माणसासारख्याच इतर समाजप्रिय प्राण्यांमधील स्वार्थ आणि स्वार्थत्याग, वात्सल्य आणि क्रौर्य अशा परस्परविरोधी भावभावनांचा जनुकीय अंगाने वेध घेताना, जितक्या स्वार्थी प्राणिजाती आहेत तितक्याच स्वार्थत्याग करणाऱ्या समाजप्रिय प्रजाती आहेत, असे त्यांनी सांगितले. साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी समुद्रतळाशी जीवसृष्टीला प्रारंभ करणाऱ्या बॅक्टेरियांपासून जगात आजमितीस अस्तित्वात असणाऱ्या सुमारे दहा लाखांहून अधिक प्रजातींचा धांडोळा घेतला असता, माणूस मुंग्यांप्रमाणेच समाजप्रिय असल्याचे सिद्ध होते, असे त्यांनी सांगितले.
उत्क्रांतीवादाचे जनक चार्लस डार्विन यांच्या प्रतिपादनांचे दाखले देत माणसाच्या अंगी असलेले स्वजातीयांना ठार मारण्याचे क्रौर्य आणि त्याच्याच जोडीला असणारे वात्सल्य यांचा आधुनिक काळापर्यंतचा प्रवास त्यांनी विषद केला. ‘स्वार्थासाठी ज्ञानाची मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न वेदकाळातही झाला. परंतु बुद्धांनी ज्ञानाच्या मक्तेदारीला आव्हान दिले. अॅरिस्टोटल, सॉक्रेटिस, महावीर यांनीही तेच केले. आधुनिक काळात बिल गेट्ससारखे लोक ज्ञानाच्या मक्तेदारीचा प्रयत्न करीत आहेत तर विकीपीडियाचे सॉफ्टवेअर बनवून मोफत उपलब्ध करणारे वॉर्ड कनिंगहमसारखे लोक या मक्तेदारीला आव्हान देत आहेत. २००० मध्ये सामान्य लोकांच्या सहभागातून सुरू झालेला नि:शुल्क विकीपीडिया हा आज उत्कृष्ट मुक्त ज्ञानकोश ठरला आहे. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या व्यापारी तत्त्वावरील ज्ञानकोशाला त्याने आव्हान दिले. संपत्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धनाड्यांचे कौतुक अर्थतज्ज्ञांसह सर्वच करतात. परंतु धैर्याचे प्रदर्शन करून अन्यायाशी लढणारे दुर्लक्षित राहतात. तथापि, आर्थिक विषमता असली तरी ज्ञानाच्या बाबतीत विषमता यापुढे राहणार नाही. लोकांना अडाणी ठेवून, माहिती लपवून राज्य करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत,’ असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर, विजय पाध्ये, ‘मसाप’ शाहूपुरी शाखेचे विनोद कुलकर्णी, किशोर बेडकीहाळ, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बाबर, नगरसेवक रवींद्र झुटिंंग, भाग्यवंत कुंभार उपस्थित होते. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
सेनापती बापटांचे काय?
श्रीमंतीचा दिमाख हे माणसाच्या गळ्यातले लोढणे आहे असे सांगून डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘मोरही केवळ लांडोरीला आकर्षित करण्यासाठी पिसाऱ्याचे ओझे सांभाळतो. उडता येत नसल्याने शिकारी प्राण्यांचे भक्ष्य ठरतो. माणसातही असाच दिमाख दाखविण्याची प्रवृत्ती आहे. टाटांनी मुळशी धरण बांधले तेव्हापासून त्यांच्या संपत्तीची चर्चा सुरूच आहे. परंतु मुळशी धरणात ज्यांनी जमिनी गमावल्या त्या शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करणाऱ्या सेनापती बापटांचे काय?’
‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलनानंतर सुबोध मराठीची चळवळ सुरू झाली. मात्र, शासकीय पातळीवर मराठीच्या भल्याचे निर्णय कधी झालेच नाहीत. लोकांपर्यंत व्यवस्था लवकर पोहोचावी. परंतु राजकीय धुरिणांनी सुबोध मराठी दूर ठेवून माहिती लपविली, याचा मराठी भाषा पंधरवडा साजरा करताना खेद होतो,’ असा टोला गाडगीळ यांनी लगावला.