‘श्रीरामवरदायिनी’ची वाट झालीय बिकट!
By admin | Published: February 25, 2015 09:24 PM2015-02-25T21:24:00+5:302015-02-26T00:17:35+5:30
महाबळेश्वर : शिवकालीन बाजारपेठही दुर्लक्षाच्या फेऱ्यात
महाबळेश्वर : महाबळेश्वरासून वीस किलोमीटर अंतरावर प्रतापगड पायथ्याशी असलेल्या पार गावातील श्री रामवरदायिनी या ऐतिहासिक स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने शिवकालीन बाजारपेठकडे जाणारी ही वाट बिकट झाली आहे.
सलग आठ ते दहा वर्षे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या रस्त्यामध्ये मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. हा रस्ता पहिला जिल्हा परिषदेमध्ये होत. परंतु आता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम या खात्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे मुंगीच्या गतीने या रस्त्याचे काम चालू आहे. शिवकालीन रामवरदायिनी मंदिराकडे पर्यटक व स्थानिक तसेच पंचक्रोशीमधील अनेक नागरिक या स्थळास भेट देत असतात. अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. पर्यटक प्रतापगडास भेट देत असताना पार या शिवकालीन ऐतिहासिक स्थळालादेखील भेट देतात.
वाडा कुंभरोशीपासून पार या गावचे प्रवेशद्वार आकर्षित बनविण्यात आला आहे. शिवकाळामध्ये पार या गावाला मोठी बाजारपेठ मानले जात होते. याच गावात श्रीरामवरदायिनीचे ऐतिहासिक मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात. प्रवेशद्वारच फक्त सुंदर दिसत असून,रस्त्याची मात्र पूर्णत: वाट लागली आहे. हे लक्षात यायला फारसा वेळ लागत नसल्याने पर्यटक तसेच स्थानिक नागरिकही हैराण झाले आहेत. या रस्त्याचे स्थानिक व पर्यटकही दुचाकीवरून प्रवास करतात. त्यांना अपघाताची भीती देखील वाटत आहे. प्रतापगडावर दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक रामवरदायिनी देवीचे दर्शन घ्यायला जायचे आहे. असे स्थानिक वाहनधारकांना सांगतात. मात्र, रस्ता खराब असल्याने तिकडे जाण्याचे टाळले जाते. (प्रतिनिधी)