VIDEO : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत एसटी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 01:43 AM2021-10-25T01:43:51+5:302021-10-25T01:46:25+5:30
गाडी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यानजीक आली असता. गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी महामार्गाच्या कडेला लावली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले होते.
सातारा : कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली. ही घटना पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यानजीक रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. यामध्ये कसलीही जीवित हानी झाली नाही.
कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली कोल्हापूर-अर्नाळा (एमएच ०९ एफएल ०९९८३) ही शयनयान एसटी रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास सातारा मध्यवर्ती बसस्थानकात आली. येथून काही वेळ थांबा घेऊन ही गाडी साडेनऊच्या सुमारास पुण्याच्या दिशेने रवाना झाली. गाडी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यानजीक आली असता. गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी महामार्गाच्या कडेला लावली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे गाडीतील सर्व प्रवाशांना सुरक्षित अंतरावर वेळेत पोहोचता आले. त्यानंतर काही क्षणात गाडीने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पाठविण्यात आले.
सातारा येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत एसटी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप#FireBrigade#Satara#Firepic.twitter.com/spkmlrekMy
— Lokmat (@MiLOKMAT) October 24, 2021
प्रवाशांना आणण्यासाठी पर्यायी गाडी -
गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यामुळे कसलीही जीवित हानी झाली नाही. यानंतर एसटी चालक-वाहकांनी सातारा मध्यवर्ती बसस्थानकात संपर्क साधून आगीच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सातारा आगारातील कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप पुन्हा सातारा बसस्थानकात आणण्यासाठी पर्यायी गाडीची व्यवस्था केली.