राज्यातील एसटी बसस्थानकं आता चकाचक!
By admin | Published: May 8, 2016 09:00 PM2016-05-08T21:00:34+5:302016-05-09T01:12:11+5:30
स्वच्छता मोहिमेस प्रारंभ : महामंडळाच्या २५० आगार, ५६८ स्थानकांचा समावेश
सातारा : महाराष्ट्राची लोकवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीमध्ये स्वच्छता अभियानाची सुरुवात होत असून एसटी महामंडळाच्या २५० आगार व ५६८ बसस्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यासाठी सफाई कामगार, राज्य परिवहन कर्मचारी यांच्याबरोबरच एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनातही स्वच्छतेबाबत जाणीव निर्माण करणे हा या अभियाना मुख्य उद्देश आहे, अशी माहिती सातारा राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक यांनी दिली आहे.प्रवाशांना स्वस्त, सुरक्षित प्रवासाबरोबरच स्वच्छ बसस्थानके उपलब्ध करुन देणे हे एसटी महामंडळाचे प्रमुख कर्तव्य आहे. किंबहुना स्वच्छतेअभावी अनेक प्रवाशी एसटीपासून दुरावण्याची वस्तुस्थिती मान्य करुन भविष्यात प्रवाशांना स्वच्छ, सुंदर बसस्थानके, आगारे, बसस्थानकावरील प्रसाधनगृहे, वाहनतळ, चालक-वाहक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांची विश्रांतीगृहे स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांबरोबर त्या विभागातील स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे, समाजसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे सहकार्य घेण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.बसस्थानकावरील प्रसाधनगृहाच्या अस्वच्छतेबाबत प्रवाशांकडून कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता संबंधित स्थानकप्रमुख व आगार व्यवस्थापकांनी घ्यायची आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन वेळेत दर दोन तासांनी प्रसाधनगृहे व बसस्थानके यांची स्वच्छतेबाबतची पाहणी करुन त्याबाबतची नोंद ठेवायची आहे.याबाबत विशेष मोहीम आखून आगार व बसस्थानकावर स्वच्छतेबाबत कर्मचारी व प्रवाशांच्या जनजागृती करण्यात आली असून १ मे पासून सर्व बसस्थानके चकाचक करण्याच्या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे, असेही विभाग नियंत्रक यांनी सांगितले आहे. सातारा मध्यवर्ती बसस्थानकातही स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात झाली असून प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
सफाईचे काम न झाल्यास कारवाई
एसटीच्या बसस्थानकावरील बहुतांश प्रसाधनगृहांची स्वच्छता परवानाधारक खासगी संस्थांकडे आहे. ज्या संस्थांकडून समाधानकारक सफाईचे काम होत नाही त्यांचेवर कारवाई करण्याच्या व स्वच्छता समाधानकारकरित्या करवून घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
उपहारगृहे, फळांच्या दुकानांचीही स्वच्छता
बसस्थानकावरील उपहारगृहे, स्नॅक्सबार, चहा-कॉफी, फळांची दुकाने स्वच्छ ठेवण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गावर ज्या ठिकाणी अल्प विश्रांतीसाठी बसेस थांबतात, त्या ठिकाणच्या उपहारगृह व स्वछतागृहे स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.