Satara: आनेवाडी टोलनाक्यावर एसटीने घेतला पेट, चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
By जगदीश कोष्टी | Updated: June 12, 2023 13:11 IST2023-06-12T13:10:48+5:302023-06-12T13:11:09+5:30
दुर्घटनाग्रस्त एसटीतील प्रवाशांना पर्यायी एसटीने पुण्याकडे मार्गस्थ

Satara: आनेवाडी टोलनाक्यावर एसटीने घेतला पेट, चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी आगाराच्या एसटीने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर चालक, वाहकाने तत्काळ प्रसंगावधानता दाखवत सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र एसटीचे मोठे नुकसान झाले. ही घटना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्याजवळ सोमवारी सकाळी साडेअकराच्या समारास घडली. यावेळी गाडीतून २७ प्रवासी प्रवास करत होते.
याबाबत माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी आगाराची राधानगरी-स्वारगेट ही गाडी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास सातारा मध्यवर्ती बसस्थानकात आली. तेथे वाहतूक नियंत्रण कक्षेत नोंद करुन नवीन प्रवाशांना घेऊन ती गाडी पुढे मार्गस्थ झाली. साधारणत: तेरा किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात आले.
त्यानंतर गाडी महामार्गाच्या बाजूला घेऊन सर्व प्रवाशांना साहित्यांसह खाली उतरवण्यात आले.
काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. जागीच्या ज्वाला उग्ररुप धारण करत होत्या. ही माहिती मिळाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव धाव घेतली. किसन वीर साखर कारखान्याच्या अग्नीशमन बंबाने काही वेळा आग नियंत्रणात आणली.
पर्यायी गाडीने प्रवासी मार्गस्थ
घटनेची माहिती समजल्यानंतर वाई आगार तसेच सातारा विभागीय कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दुर्घटनाग्रस्त एसटीतील प्रवाशांना पर्यायी एसटीने पुण्याकडे मार्गस्थ केले.