हृदयविकाराचा धक्का येऊनही एसटी चालकाने वाचविले प्रवाशांचे प्राण, कऱ्हाडमधील घटना
By संजय पाटील | Published: February 19, 2024 08:40 PM2024-02-19T20:40:08+5:302024-02-19T20:41:01+5:30
उपचारावेळी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
कऱ्हाड : महामार्गावर धावत्या एसटीच्या चालकाला हृदयविकाराचा जोराचा धक्का बसला. मात्र, त्यातही चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटी दुभाजकावर चढवून जागीच थांबवली. त्यामुळे ३१ प्रवाशांचे प्राण बचावले. मात्र, उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू झाला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाडनजीक वारुंजी गावच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली.
राजेंद्र विष्णू बुधावले (रा. सुळेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) असे संबंधित एसटी चालकाचे नाव आहे. याबाबत वाहक फारुक कासीम शेख (रा. विटा) यांनी कऱ्हाड शहर पोलिसात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटा आगाराची विटा ते स्वारगेट ही एसटी घेवून चालक राजेंद्र बुधावले व वाहक फारुक शेख हे दोघेजण कडेगावमार्गे कºहाडमध्ये आले. कऱ्हाड बसस्थानकातून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एसटी साताऱ्याकडे जाण्यासाठी निघाली. त्यावेळी एसटीत ३१ प्रवासी होते. एसटी महामार्गावर वारुंजी गावच्या हद्दीत आली असताना चालक बुधावले यांना हृदयविकाराचा तिव्र धक्का बसला. त्यामुळे त्यांनी धावती एसटी दुभाजकावर घालून तेथेच थांबवली.
अचानक एसटी थांबल्यामुळे वाहक फारुक शेख हे केबिनजवळ गेले. त्यावेळी चालक बुधावले यांना प्रचंड घाम आला होता. तसेच चक्कर येत असल्याचे ते म्हणत होते. त्यामुळे वाहक शेख यांनी तातडीने सर्व प्रवाशांना खाली उतरवून दुसऱ्या एसटीत बसवले. तसेच चालक बुधावले यांना रिक्षातून साई रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना बुधावले यांचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.