सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचा-यांच्या संपानं प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 05:31 PM2017-10-17T17:31:40+5:302017-10-17T18:08:06+5:30
सातारा , दि. १७ : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचार्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या संपात सुमारे साडेचार हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सणानिमित्ताने गावी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. यामुळे वडाप चालकांची मात्र दिवाळी झाली.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेण्यांसह सातवा वेतन आयोग मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने मंगळवारी पहाटेपासून ऐन दिवाळीत बेमुदत संप सुरू केला आहे.
मान्यताप्राप्त कामगार संघटनने सुरू केलेल्या आंदोलनात एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना आदींनी पाठिंबा दिला आहे. चालक, वाहक, कार्यशाळेतील तांत्रिक कर्मचार्यांबरोबर लिपिकही सहभागी झाले आहेत.
ऐनवेळी फूट पडलीच तरी आंदोलन विस्कटू नये म्हणून काही कर्मचार्यांनी सातारा बसस्थानकातील एसटीच्या चाकातील हवा सोडून दिली आहे. तसेच इतर गाड्या बाहेर निघणार नाही, अशा प्रकारे गाड्या आडव्या लावल्या आहेत. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे.
खासगी वाहतूकदारांची दिवाळी
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी एसटी बसस्थानकाकडे फिरकलेच नाहीत. महामार्गावरच ते थांबलेले असल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस, वडापकडे हे प्रवासी वळू लागले आहेत