पास असूनही एसटीच्या प्रवासासाठी नापास ! शिक्षणासाठी खासगी वाहनांचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:35 PM2018-09-12T23:35:52+5:302018-09-12T23:36:15+5:30
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या अजब कारभारामुळे शिरवळ येथील विद्यार्थ्यांना खंडाळ्याला शिक्षणासाठी जाण्यासाठी एसटीचा पास असूनही खासगी वाहनाने जावे लागत आहे.
शिरवळ : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या अजब कारभारामुळे शिरवळ येथील विद्यार्थ्यांना खंडाळ्याला शिक्षणासाठी जाण्यासाठी एसटीचा पास असूनही खासगी वाहनाने जावे लागत आहे. विशेष म्हणजे खंडाळा पंचायत समितीने ठराव करूनही संबंधित ठराव हा केवळ कागदापुरता मर्यादित राहिला आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिरवळ नागरिकांनी परिवहनविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
औद्योगिकदृष्ट्या प्रगत होणाºया व खंडाळा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिरवळमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात खंडाळा येथील महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी जात असतात. दरम्यान, खंडाळा याठिकाणी जाण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी काढलेला एसटीचा मासिक पास म्हणजे केवळ शोपीस ठरत आहे. महामंडळाच्या पारगाव-खंडाळा आगाराकडून एसटी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने मासिक पास केवळ कागदापुरता मर्यादित राहिला असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना आर्थिक व मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
याउलट खंडाळ्याला महाविद्यालयात जाणे व शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव आशियाई महामार्गावर येऊन थांबावे लागत आहे. त्यामध्येच महामार्गावरून जाणाºया एसटी विद्यार्थ्यांना पास असल्याने घेत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालक येतात. त्यावेळी विद्यार्थ्यांना एसटीमध्ये घेण्यावरून पालक आणि एसटी चालक-वाहक यांच्यामध्ये वादावादीचे प्रकार होताना दिसत आहेत.
एकूणच एसटी महामंडळाच्या अजब कारभाराच्या नमुन्याचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने खंडाळा याठिकाणी प्रवास करावा लागत आहे. प्रवास करत असताना कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न शिरवळकर नागरिकांमधून विचारला जात आहे.
शिरवळ येथील विद्यार्थ्यांना एसटी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एसटी प्रशासनाने याबाबत दाखल न घेतल्यास शिरवळकर नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
- राजेंद्र तांबे, सदस्य खंडाळा पंचायत समिती
शिरवळ येथील विद्यार्थ्यांच्या समस्येसंदर्भात लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे एसटीची सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- ज्योती गायकवाड, आगार व्यवस्थापक पारगाव-खंडाळा