अंबेनळी घाटात एसटी-खासगी बसचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:30 AM2019-11-27T00:30:01+5:302019-11-27T00:30:27+5:30
महाबळेश्वर : महाबळेश्वर-महाड रस्त्यावरील अंबेनळी घाटात मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एसटी व खासगी बसचा समोरासमोर अपघात झाला. यात ...
महाबळेश्वर : महाबळेश्वर-महाड रस्त्यावरील अंबेनळी घाटात मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एसटी व खासगी बसचा समोरासमोर अपघात झाला. यात एसटी बसचालकाने दाखवलेल्या अप्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले अन् सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, आठ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी की, अहमदनगर येथील देसरडा भंडारे प्रोफेशल अॅकॅडमीचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी असे १२० जण तीन बसमधून महाबळेश्वरला सहलीसाठी आले होते. बुधवारी सकाळी ते सर्वजण प्रतापगड किल्ल्यावर गेले होते. तेथून ते पुन्हा अंबेनळी घाटातून महाबळेश्वर येथे परतत होते. खासगी बस घाट चढून एका वळणावर आल्या. दरम्यान, महाबळेश्वर बसस्थानकातून महाबळेश्वर-महाड ही बस (एमएच १४ बीटी ३८४९) मार्गस्थ झाली होती. ही बस अंबेनळी घाट उतरत असताना खासगी बस (एमएच १६ बीसी २४५१) समोर आली.
खासगी बसचालक शेपराव बुवा खेडकर याचा बसवरील ताबा सुटल्याने तो डाव्या बाजूवरून उजव्या बाजूला गेला. एसटी बसचे चालक अतुल चव्हाण यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र, खासगी बस एसटीच्या समोरील भागाला आदळली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान होऊन बसमधील प्रवासी जखमी झाले. एसटी बस थांबली नसती तर मोठा अपघात होऊन अनर्थ घडला असता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या अपघातात दोन्ही बसमधील साधारण आठ प्रवासी जखमी झाले. एसटीमधील प्रवाशांना महाबळेश्वर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर खासगी बसमधील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी हलविण्यात आले. या अपघातात अंबेनळी दूरक्षेत्रावरील पोलीस बाजीराव चौधरी, महाबळेश्वर बस आगार प्रमुख नामदेव पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. या अपघाताची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.