औंधच्या बस स्थानकात एसटी धावू लागली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:37 AM2021-04-11T04:37:33+5:302021-04-11T04:37:33+5:30
औंध : औंध बस स्थानक परिसरातील रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच महिन्यांपासून रखडलेले आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत ...
औंध : औंध बस स्थानक परिसरातील रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच महिन्यांपासून रखडलेले आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने एसटी बस स्थानकात जात नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना चौकात बसची वाट बघत तीव्र उन्हात तिष्ठत बसावे लागत होते. या बाबींवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकताच संबंधित ठेकेदाराकडून एसटी बस स्थानकात जाण्यासाठीची उपाययोजना करण्यात आली आहे. मात्र, काम जैसे थे असल्याने व्यापारी व ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
पुसेगाव-म्हासुर्णे रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून अगदी कासवाच्या गतीने सुरू आहे. खबालवाडी फाटा ते केदारचौक रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. छोटे सिडीवर्क आणि केदारेश्वर मंदिरानजीकच्या पुलाचे काम बरेच दिवस सुरू आहे. एखादे अवजड वाहन त्यातून जाताना धुरळ्याचे साम्राज्य निर्माण होत आहे. परिणामी, आसपास राहणाऱ्या नागरिकांना, तसेच विशेषतः व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर रस्ता उखडल्याने बस स्थानकात एसटी जात नव्हती, त्यामुळे प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांना चौकात गाडीसाठी थांबावे लागते. बस वेळेवर येत नाही आणि वाट बघत बसण्यासाठी कुठेही सावली नसल्याने विद्यार्थ्यांना उन्हात बसची वाट पाहात तिष्ठत बसावे लागत होते. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना झाली. एसटी आत धावू लागली व प्रवासी, विद्यार्थी उन्हापासून सावलीत गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली. असे असले, तरी व्यापारी व नागरिक आता आमच्याकडे लक्ष द्या, काम पूर्ण करण्यास सांगा व धुरळ्यापासून आमचा बचाव करा, अशी हाक देऊ लागले आहेत.
फोटो : औंध बस स्थानक परिसरात तात्पुरती उपाययोजना केल्याने एसटी धावू लागली आहे. (छाया-रशिद शेख)
लोकमतचा प्रभाव लोगो वापरावा