वाईनजीक अपघातात एसटी उलटली
By admin | Published: January 4, 2017 11:10 PM2017-01-04T23:10:57+5:302017-01-04T23:10:57+5:30
आठ प्रवासी जखमी : टेम्पोच्या धडकेनंतर चालकाचा ताबा सुटला
वाई: वाई-किरुंडे एसटी व टेम्पोची समोरासमोर धडक झाल्यानंतर एसटी ओढ्यात कोसळली. यामध्ये आठ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर वाईतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी साडेतीन वाजता वेलंग येथे झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाई आगारातून सुटणारी वाई-किरुंडे एसटी (एमएच १४ बीटी २१५७) किरुंडेकडे निघाली होती. वेंलग येथील पानस वस्तीजवळ ही एसटी आली असता आसरे कडून वाईच्या दिशेने येणाऱ्या गॅस टेम्पोची एसटीला धडक बसली. त्यामुळे एसटी पलटी होऊन ओढ्यात कोसळली. यामध्ये आठ प्रवासी जखमी झाले़ वळणावरील तीव्र उतारावर बसचालकाला अचानक टेम्पो दिसला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
या अपघातानंतर जखमी झालेल्या प्रवाशांनी परिसरातील नागरिकांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील अशोक मांढरे, विशाल सपकाळ, संतोष शिंदे यांच्यासह इतर नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी जखमी प्रवाशांना एसटीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली़ बसमध्ये किरुंडे गावचे उपसरपंच मनोज मांढरे हे होते. त्यांनी अशोक मांढरे यांना फोनवरून याची माहिती दिली. मांढरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मित्रांच्या मदतीने स्वत:च्या गाडीतून काही प्रवाशांना वाई येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले़ उर्वरित प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांनी दुसऱ्या बसमधून वाई येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)
एसटीतील जखमी प्रवासी
प्रियांका सणस, मुक्ता सणस, सविता सणस (रा.़ रेणावळे), सुरेश चिकणे (रा. जांभळी), सुजाता दानवले (रा़ वासोळे), शारदा कोंढाळकर (रा. कोंढावळे), सखाराम चिकणे (वडवली), वाहक केदारे यांचा समावेश आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे़.