भाजी करपल्याने संताप, जोडीदारावर चाकूने वार; साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 12:37 PM2024-02-22T12:37:25+5:302024-02-22T12:39:06+5:30
सातारा : भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या दोघा जोडीदारांमध्ये भलत्याच कारणावरून वाद झाला. जेवण बनविताना भाजी करपल्याने संतापाच्या भरात जोडीदारावर ...
सातारा : भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या दोघा जोडीदारांमध्ये भलत्याच कारणावरून वाद झाला. जेवण बनविताना भाजी करपल्याने संतापाच्या भरात जोडीदारावर चाकूने हातावर, गळ्यावर, मानेवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना दि. १९ रोजी कोडोली (धनगरवाडी), ता. सातारा येथे घडली. शुक्रराज कैलास चव्हाण (वय ४०, रा. धनगरवाडी, कोडोली) असे जखमी झालेल्याचे नावे आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रराज चव्हाण आणि राजकुमार (रा. भागलपूर, बिहार) हे दोघे एकाच ठिकाणी राहतात. शुक्रराज चव्हाण हे गॅरेजमध्ये काम करतात. दि. १९ रोजी सकाळी साडेआठ वाजता ते सकाळी जेवण बनवत होते. त्यावेळी त्यांच्याकडून भाजी करपली. यामुळे संतप्त झालेल्या राजकुमारने त्यांच्यावर चाकूने उजव्या हातावर दोन वार केले. त्यानंतर गळ्यावर, मानेवरही चाकूने वार केले. यामध्ये शुक्रराज गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविल्यानंतर राजकुमार याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अविनाश गवळी हे अधिक तपास करीत आहेत.