जिल्ह्यातील २७५ शाळा संपावर
By admin | Published: December 9, 2015 11:28 PM2015-12-09T23:28:13+5:302015-12-10T01:03:07+5:30
१५ हजार शिक्षकांचा सहभाग : शासनाने मागण्या मान्य न केल्यास ११ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा
सातारा : सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे पुकारण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनात जिल्ह्यातील ६६७ माध्यमिक शाळांपैकी २७५ शाळांनी सहभाग घेतला. सातारा शहरातील बहुतांश शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या संपामध्ये जिल्ह्यातील १५ हजार शिक्षक सहभागी झाल्याचा दावा मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रामधील विविध प्रश्नांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे बुधवार, दि. ९ रोजी संपूर्ण जिल्ह्यात लाक्षणिक शाळाबंद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यानुसार महाराष्ट्रातील सर्व शाळा दि. ९ व १० डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. या शाळाबंद आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व संघटना सक्रीय सहभाग घेत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा दि. ९ व १० डिसेंबर रोजी बंद ठेवून या आंदोलनास जिल्ह्याच्या वतीने सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ, सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सातारा, शिक्षण परिषद, माध्यमिक शाळा कृती समिती, टी.डी. ए. संघटना, शारीरिक शिक्षक संघटना, कला शिक्षक संघटना, शिक्षकेत्तर संघटना, शाळा गं्रथपाल संघ या संघटनांनी पाठिंबा दर्शविल्याचे मुख्याध्यापक संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
सातारा शहरातील बहुतांश शाळांनी या बंदमध्ये सहभाग घेतला. काही शाळा दुपारपर्यंत सुरू होत्या. मात्र, दुपारनंतर मुलांना घरी सोडण्यात आले.
शासनाने दि. २८ आॅगस्ट २०१५ चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा अहवाल मान्य करावा, खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्ता कायम ठेवावी, कला-क्रीडा शिक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करावी, तसेच दि.७ आॅक्टोबर २०१५ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, दि. १ नोव्हें.२००५ पूर्वी सेवेत असलेल्या व त्यानंतरही सेवेत आलेल्या अशा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, प्राथमिक शाळांमध्ये लिपिक व सेवकांची पदे मान्य करून भरावीत, शासनाने शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्र राबवावी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शालाबाह्य कामे देऊ नयेत, अनुदानास पात्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग तुकड्यांना अनुदान द्यावे, आदी मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये १५ हजार शिक्षक सहभागी झाले होते. शासनाने मागण्या मान्य नाही केल्या, तर ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
- संजय यादव, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ
जिल्ह्यामध्ये २ हजार ७३२ इतक्या जिल्हा परिषदेच्या तर ३0९ खासगी शाळा आहेत. प्राथमिक विभागातील एकाही शाळेने या बंदमध्ये सहभाग घेतला नाही.
- पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्ह्यातील ६६७ माध्यमिक शाळांपैकी २७५ शाळांनी बुधवारी झालेल्या संपात सहभाग नोंदविला होता. मुख्याध्यापक संघटनेने या बंद विषयी दोन दिवसांपूर्वीच निवेदन सादर केले होते.
- देवीदास कुल्लाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)