साताऱ्यात मिरवणुकीवेळी चेंगराचेंगरी; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचला
By सचिन काकडे | Published: September 29, 2023 12:13 PM2023-09-29T12:13:13+5:302023-09-29T12:14:11+5:30
साताऱ्यातील सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे गुरुवारी मोठ्या उत्साहात विसर्जन झाले.
सातारा : सातारा शहरात गणेशमूर्ती विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्रचंड चेंगराचेंगरी झाल्याने एक तरुण गुदमरून बेशुद्ध पडला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून त्या तरुणाला गर्दीतून सुरक्षित बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले.
साताऱ्यातील सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे गुरुवारी मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. मंडळाकडून बाप्पांच्या विसर्जनासाठी भव्य-दिव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास राजपथावरील मोती चौक परिसरात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. या गर्दीतून वाट काढताना अनेकांची दमछाक उडाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत गर्दीतील एक तरुण गुदमरून बेशुद्ध पडला.
ही घटना निदर्शनास येताच बंदोबस्तासाठी असलेले एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक अमित पाटील, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत यादव, पोलिस हवालदार विजय कांबळे, शरद बेबले, पोलिस नाईक अविनाश चव्हाण, सूरज रेळेकर, चंद्रकांत टकले, प्रवीण फडतरे या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गर्दी बाजूला करून तरुणाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला.