Satara: जाधववाडी जवळील फरशीपुलाजवळ भगदाड, धोकादायक वाहतूक
By दीपक शिंदे | Published: July 22, 2023 12:00 PM2023-07-22T12:00:58+5:302023-07-22T12:01:50+5:30
पूल कोसळून अपघाताची शक्यता
सणबूर : मालदन स्टॉप ते पाचपुतेवाडी हा एक किलोमीटर अंतराचा रस्ता ढेबेवाडी विभाग व काळगाव विभागाला जोडणारा जवळचा मार्ग आहे. नेहमी वाहतूक असलेल्या या मार्गावर जाधववाडी फाट्या जवळील ओढ्यावर नवीन साकव पुलाचे बांधकाम झाले. मात्र, साकव पुलाच्या बांधकामात अजून भरावाचे काम अपूर्ण असून, पावसाळ्यापूर्वी भराव न टाकल्यामुळे रस्ता खचून वाहतूक धोकादायक झाली आहे. ऐन पावसाळ्यात रस्ता तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ढेबेवाडी विभाग हा अनेक खो-यांमध्ये विभागला आहे. विभागातील मध्यवर्ती बाजारपेठेचे ठिकाण म्हणून ढेबेवाडी बाजारपेठेची ओळख आहे. पोलीस ठाणे, वन विभागाचे कार्यालय, शाळा, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय व इतर शासकीय कामकाजासाठी याठिकाणी विभागातील अनेक गावांतील ग्रामस्थांचा राबता असतो.
काळगाव-धामणी-कुठरे खोऱ्यातील गावे, वाड्या येथील लोकांना बाजारपेठेत येण्यासाठी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पाचपुतेवाडी ते मालदन स्टॉप दरम्यान जवळच्या मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वहातूक असते. दोन वर्षा पुर्वी जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे या एक कि.मी. मार्गावर जाधववाडी फाट्याजवळ असलेल्या फरशी पुलाला रस्त्याच्या लगत १० ते १५ फूट खोल भगदाड पडलेले होते. अवजड वाहनांमुळे संपूर्ण फरशी पूल कोसळून अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.
मात्र, काही महिन्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण काम झाले असून या धोकादायक फरशी पुलाच्या ठिकाणी नवीन साकव पुलाचे काम मंजूर होऊन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, साकव पुलाचे बांधकाम झाले असून भरावाचे काम अपूर्ण असल्यामुळे येथील रस्ता खचू लागला असून अपघाताचा धोका वाढला आहे.