साताऱ्यात शहर बस सेवेसाठी कृती समितीच्या हालचाली!, गेली २० वर्षे बस सेवा बंद 

By प्रगती पाटील | Published: September 26, 2023 06:27 PM2023-09-26T18:27:17+5:302023-09-26T18:27:35+5:30

सातारा : वाढते इंधनाचे दर, वाहनांच्या वाढत्या किमती, पार्किंगची गैरसोय, अपुरे रस्ते, वाहतुकीची कोंडी यामुळे सातारकर हैराण आहेत. या ...

Start city bus transport service which has been closed for last 20 years, Demand from Satarkar | साताऱ्यात शहर बस सेवेसाठी कृती समितीच्या हालचाली!, गेली २० वर्षे बस सेवा बंद 

साताऱ्यात शहर बस सेवेसाठी कृती समितीच्या हालचाली!, गेली २० वर्षे बस सेवा बंद 

googlenewsNext

सातारा : वाढते इंधनाचे दर, वाहनांच्या वाढत्या किमती, पार्किंगची गैरसोय, अपुरे रस्ते, वाहतुकीची कोंडी यामुळे सातारकर हैराण आहेत. या पार्श्वभूमीवर गेली २० वर्षे बंद असलेली शहर बस वाहतूक सेवा सुरू करावी अशी मागणी समस्त सातारकरातून जोर धरू लागली आहे. ही मागणी तडीस नेण्यासाठी साताऱ्यात कृती समितीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सातारा शहरात यापूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरु होती.  20 वर्षांपूर्वी ही सेवा बंद झाली. मागील 20 वर्षांत सातारा शहराचा विस्तार आणि लोकसंख्याही लक्षणीयरित्या वाढली. परिसरातील उपनगरेही आता सातारा नगर पालिकेच्या हद्दीमध्ये आली आहेत. शहराची रचना डोंगर उताराची असल्याने चालत सर्वत्र येणे-जाणे शक्‍य होत नाही. दुचाकी चालवता न येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणताही किफायतशीर वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नाही. प्रत्येकाला माणसा गणिक दुचाकी खरेदी करणे व वापरणे परवडणारे नाही.

शहरात पुण्याप्रमाणे सीएनजी रिक्षा नाहीत. शिवाय इंधनाच्या वाढत्या दरामुळे रिक्षाचालकांना मीटरवर रिक्षा चालवणे परवडत नाही. इतकी वर्षे रस्तेही ठिक नसल्याने रिक्षा दुरुस्तीवरही मोठा खर्च होत असे. खावली-रेल्वे स्टेशन ते दरे खुर्द हा पूर्व-पश्‍चिम विस्तार आणि बोगदा ते लिंबखिंड असा दक्षिण-उत्तर विस्तार पाहता जगतापवाडी-तामजाईनगरसह अनेक भागांना जोडणारी सिटी बस सेवा सुरु होणे गरजेचे आहे. सध्याचा गणेशोत्सव असेल किंवा येणारे नवरात्र असेल, सातारा शहरात गेल्या काही वर्षांत वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. सातारा शहराची रचना चढ-उताराची असल्याने दैनंदिन कामांसाठी हाताशी काही वाहन असणे आवश्‍यक ठरले आहे. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे प्रदूषणा बरोबरच पार्किंगचा प्रश्न जटील बनला आहे. 

शहर बस वाहतुकीच्या सर्व बसेस या मिनी बसेस असणे आवश्‍यक आहे. शहरातील लहान आणि अरुंद रस्त्यांवरुन 50 सिटर मोठ्या बसेस पळवण्यात काहीही अर्थ नाही. बस रूट आखताना एक सर्वव्यापी रिंगरोड असणे आवश्‍यक आहे, अशी मते समाज माध्यमातून सातारकर व्यक्त करत आहेत. जनरेटा वाढू लागल्यामुळे सातारा सिटी बस नागरिक कृती समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत.

लोकप्रतिनिधींनी घ्यावा पुढाकार

या बस सेवेमध्ये दैनंदिन पासेस, मासिक पास, विद्यार्थी विशेष, महिला विशेष असे भागही करता येतील. काही बसेस वातानुकुलीतही ठेवता येतील. या सर्व बसेस बॅटरी किंवा इलेक्ट्रिक असतील तर प्रदुषणही टळेल. सातारकरांच्या हिताची काळजी असणाऱ्या सर्व नेत्यांना पक्षभेद विसरून हा प्रकल्प मार्गी कसा लावता येईल ते पहावे. 

वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता, सातारा शहरामध्ये नव्या युगाशी सुसंगत अशी शहर बस वाहतूक सेवा सुरु होणे  गरजेचे आहे. नगर परिषद प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प आकाराला येऊ शकतो. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सातारचे असल्याने, ते या प्रश्‍नाकडे तातडीचा प्रश्‍न म्हणून पाहतील आणि सातारकरांना आगामी दिवाळीची भेट बससेवेच्या रुपाने देतील, अशी अपेक्षा आहे.  - श्रीनिवास वारुंजीकर,  प्रवर्तक, "सातारा सिटीबस नागरिक कृती समिती'

Web Title: Start city bus transport service which has been closed for last 20 years, Demand from Satarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.