‘दत्तक गाव’ योजनेला उत्साहात प्रारंभ
By Admin | Published: November 20, 2014 10:04 PM2014-11-20T22:04:23+5:302014-11-21T00:27:27+5:30
जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ९१३ कुटुंबांकडे आजही शौचालय नाही, ही वस्तुस्थिती आहे
सातारा : जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ९१३ कुटुंबांकडे आजही शौचालय नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रबोधन व्हावे, यासाठी ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत उपक्रम जिल्हा परिषदेने राबविला आहे. याअंतर्गत साडेदहा हजार पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी गाव दत्तक घेतले असून, या गावांना गुरुवार, दि. २० रोजी त्यांनी भेटी दिल्या आहेत.
‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमासोबतच शौचालय नसलेल्या कुटुंबाना गृहभेटीचा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत हाती घेण्यात आला आहे. यामध्ये दहा हजार ६९६ अधिकारी, पदाधिकारी सहभागी झाले आहेत. कुटुंबांना भेटी देऊन शौचालय बांधणीसाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. नऊ कुटुंबे दत्तक घेऊन दि. २६ जानेवारीपर्यंत स्वच्छतागृह बांधण्याबाबत पुढकार घेण्यात येणार आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून केंद्र शासनाने दि. २ आॅक्टोबर पासून ‘स्वच्छ भारत मिशन’ या उपक्रमास सुरुवात केली आहे. यात सातारा जिल्हा अग्रेसर राहावा, यादृष्टीने जिल्हा परिषदेतर्फे उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील १,४३५ ग्रामपंचायती निर्मल झालेल्या आहेत. परंतु, २०१२ च्या सर्वेक्षणानुसार आजही जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ९१३ कुटुंबांकडे शौचालय नाही. अनेक कुटुंबांकडे स्वच्छतागृह आहे; मात्र त्याचा वापर केला जात नाही. ज्यांना नाही त्यांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी प्रवृत्त करणार आहे, त्यांना सहकार्य करण्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत अधिकारी व पदाधिकारी यांनी प्रयत्न चालविले आहेत.
प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीपैकी शौचालय नसलेल्या २५ कुटुंबांना भेटी देण्यात येणार आहेत. त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार असून, नऊ कुटुंबे दत्तक घेण्यात येणार आहेत. त्यासाठी अधिकारी, पदाधिकारी कामाला लागले असून, गुरुवारी त्यांनी गाव व घरभेटी दिल्या आहेत. त्यांना त्या-त्या गावातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
जिल्ह्याला यावर्षी ३४ हजार १९६ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे आठ हजारांवर शौचालये बांधून पूर्ण आहेत. उर्वरितांनी शौचालये बांधावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
प्रत्येक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी एक गाव दत्तक घेतले आहे. मी घेतलेल्या गावात मुख्यत्व पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे स्वच्छतागृहाच्या वापरावर मर्यादा हे येणार आहेत, हे टाळण्यासाठी पाण्याची सोय सर्वप्रथम करणार आहे.
- माणिकराव सोनवलकर
अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा
जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आरफळ, मी शिवथर दत्तक घेतले आहे. त्याठिकाणी आम्ही प्रबोधन केले आहे. घरच्या पाहुण्यांना सार्वजनिक ठिकाणी न पाठविता घरोघरी स्वच्छतागृह बांधण्यास सांगितले आहे.
- जी. श्रीकांत,
मुख्य कार्यकारी अधिकारी