निवडणुकीची धामधूम सुरू
By admin | Published: January 17, 2017 12:07 AM2017-01-17T00:07:44+5:302017-01-17T00:07:44+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती : उमेदवारांच्या मुलाखती, मेळावे, बैठका
सातारा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगे्रस, राष्ट्रीय काँगे्रस यांच्यासोबतच भाजप, शिवसेना या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हाभर सर्वच पक्षांच्या बैठका, मेळावे सुरू आहेत. राष्ट्रवादीतर्फे सोमवारी वाई, महाबळेश्वर, खंडाळा व फलटण या चार तालुक्यांतील २११ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. याआधी सर्वच पक्षांनी उमेदवार निवडीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँगे्रस विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र कायम होते. आता मात्र भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी दंड थोपटल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आलेली आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने सोमवारी घेतलेल्या मुलाखतीसाठी राष्ट्रवादी भवनात मोठी गर्दी झाली होती. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, पक्ष निरीक्षक सुरेशराव घुले, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीतर्फे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
काँगे्रसनेही या निवडणुकांची जोरदार तयारी केली असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत २४ किंवा २५ जानेवारी रोजी काँगे्रस कमिटीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी दिली. शिवसेना पक्षचिन्हावर ही निवडणूक लढणार असून, पक्षाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम स्वत: मल्हारपेठ (ता. पाटण) गटातून निवडणूक लढणार आहेत. गुरुवारी (दि. १९) सातारा येथे सकाळी ११ वाजता शिवसेनेतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. पालकमंत्री विजय शिवतारे, उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. शिवसेनेच्याही सध्या तालुकावार बैठका सुरू आहेत.
भाजपतर्फे जिल्ह्यात गटवार मेळावे सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी ५ वाजता महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी करहर (ता. जावळी) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)