माळरानावर काळ्या सोन्याचा थर, नेरमधील गाळ काढणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:19 PM2019-03-19T13:19:30+5:302019-03-19T13:23:39+5:30
खटाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या नेर तलावातील गाळ काढण्याचे काम निवृत्त सैनिकांच्या पुढाकाराने आणि पुण्यातील ग्रीन थंब संस्थेच्या माध्यमातून सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येणार असून, यामुळे माळराने पिकाऊ होणार असून, पाणीसाठाही वाढणार आहे.
पुसेगाव : खटाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या नेर तलावातील गाळ काढण्याचे काम निवृत्त सैनिकांच्या पुढाकाराने आणि पुण्यातील ग्रीन थंब संस्थेच्या माध्यमातून सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येणार असून, यामुळे माळराने पिकाऊ होणार असून, पाणीसाठाही वाढणार आहे.
नेर तलाव हा व्हिक्टोरिया राणीच्या काळात बांधण्यात आलेला आहे. या तलावाला मोठा जलाशय लाभला असून, या तलावातील पाण्यावर परिसरातील अनेक गावांची शेती अवलंबून आहे. तसेच खटाव तालुक्यातील काही गावांची तहानही हा तलाव भागवतो.
दुष्काळी भागात असणाऱ्या या तलाव्यात चांगला पाणीसाठा झाला तरच फायदा होतो. अन्यथा टंचाईला सामोरे जावे लागते. त्यातच या तलावात गाळाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यातील ग्रीन थंब संस्थेचे अध्यक्ष व निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांच्या माध्यमातून या तलावातील गाळ काढण्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. मात्र, काही कारणास्तव ते थांबले होते; पण पुन्हा एकदा हे काम सुरू झाले आहे.
नेर तलाव परिसरात आता लोकसहभाग आणि काही संस्थेच्या सहकार्यातून गाळ काढणे सुरू झाले आहे. या तलाव्यात मोठ्या प्रमाणात गाळ असून, तो काढण्याने दुहेरी फायदा होणार आहे. शेतकरी तो माळरानावर टाकून बागायती क्षेत्र करतील तसेच तलावातील पाणीसाठाही वाढणार आहे.
सध्या काढलेला गाळ शेतकरी डंपरमधून नेऊन शेतात टाकत आहेत. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येत आहे. यामुळे माळरानावर काळ्या सोन्याचा थर दिसू लागला आहे.
निवृत्त कर्नल शिवाजीराव घाडगे यांच्या हस्ते गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ झाला.
यावेळी निवृत्त कर्नल सुरेश पाटील, कालवा निरीक्षक ए. पी. लेंभे, नेरच्या सरपंच विद्या देशमुख, वर्धनगडचे सरपंच अर्जुन मोहिते, पवारवाडीचे सरपंच महेश पवार, श्रीधर माने, कल्याण भोसले आदी उपस्थित होते.