कास पर्यटन सुधारित शुल्क आकारणीस प्रारंभ
By admin | Published: August 26, 2016 12:27 AM2016-08-26T00:27:56+5:302016-08-26T01:13:56+5:30
उदयनराजेंच्या हस्ते उद्घाटन : फुलांना पोषक वातावरण
पेट्री : रंगीबेरंगी फुलांनी आच्छादलेले विस्तीर्ण कास पठार, फेसाळणारे धबधबे पाहण्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो पर्यटक कासला भेट देत असतात. जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश झालेले कास पठार पाहण्यासाठी शुक्रवार, दि. २६ पासून शुल्क आकारण्यात येणार आहे. सुधारित दराने शुल्क आकारणीस खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते गुरुवारी प्रारंभ करण्यात आला.
गर्द हिरवळ, ठिकठिकाणी फुललेल्या रंगीबेरंगी रानफुलांचे ताटवे, रस्त्याच्या कडेला कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, अन् दाट धुके हे दृश्य कोण्या चित्रीकरणासाठी उभारलेला कृत्रिम सेट नव्हे तर कास पठारावर नेहमीच पाहायला मिळतो.
जागतिक वारसास्थळाच्या यादीत स्थान पटकाविलेल्या कास पठाराला सतत पर्यटकांचा बहर वाढत आहे. गेल्या आठवड्यापासून अधूनमधून कडक ऊन पडत असल्याने फुलांनाही बहर येण्यास सुरुवात झाली आहे. कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू होत असल्याने राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने सुटी दिवशी येऊ लागले आहेत.
संयुक्त वन व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या सुधारित दर आकारण्यास गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, दीपक खानिलकर, अशोक घोरपडे, राजेश शिंदे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक अनिल जोशी, कास, कासाणी, एकीव, आटाळी, कुसुंबी मुरा, वांजळवाडी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच वनक्षेत्रपाल, वनरक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)
पहिली पावती उदयनराजेंची
संयुक्त वन व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या दराला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या मोहिमेस प्रारंभ झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पहिली पावती फाडण्यात आली. त्यांच्याकडून हजार रुपये घेण्यात आले.