शाळा सुरू; पण एसटीचा पत्ताच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:37+5:302021-01-25T04:39:37+5:30
मायणी : नववी ते बारावीचे शैक्षणिक वर्ग सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी ग्रामीण भागातील बहुतांशी गावांमध्ये एसटी पोहोचलीच ...
मायणी : नववी ते बारावीचे शैक्षणिक वर्ग सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी ग्रामीण भागातील बहुतांशी गावांमध्ये एसटी पोहोचलीच नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील गावांना वेळेवर बस सोडावी, अशी मागणी विद्यार्थी व पालक संघटनेतून होत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व नंतर तब्बल आठ महिन्यांनंतर शाळा, महाविद्यालये सुरू झाली. यामध्ये शासनाने नववी ते बारावीचे वर्ग नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू केले. मात्र, शाळा सुरू करताना शाळेसाठी इतर आवश्यक असलेल्या बेसिक गरजांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
मायणी परिसरातील विखळे, कलेढोण, पाचवड, मुळकवाडी, तरसवाडी, ढोकळवाडी, कान्हरवाडी, हिवरवाडी, चितळी, म्हासुर्णे, मराठानगर, मोराळे, निमसोड, धोंडेवाडी, सूर्याचीवाडी, पिंपरी व कातरखटाव गावाच्या परिसरातील शेकडो विद्यार्थी माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मायणी येथे येत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना येण्यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या वेळेत एसटी नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थिनींसाठी अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना आहे. त्यामुळे त्यांना पासच्या पैशाचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत नाही; मात्र विद्यार्थिनींना एक महिन्याच्या पासचे पैसे आदी भरावे लागतात. पास काढूनही एसटी वेळेत नसल्याने आर्थिक नुकसानीसही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित आगाराने शाळा, महाविद्यालयाच्या वेळेत नियमित व वेळेवर एसटी बस सुरू करावी व विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी पालक, विद्यार्थी संघटनेकडून होत आहे.
चौकट -
२७ जानेवारीपासून शासनाने पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वडूज आगाराने या मार्गावर शाळा, महाविद्यालयाच्या वेळेत नियमित एसटी सुरू करावी व विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान टाळावे.