माणगंगेच्या अस्तित्वासाठी दुसऱ्या परिक्रमेस प्रारंभ
By admin | Published: February 22, 2015 10:16 PM2015-02-22T22:16:18+5:302015-02-23T00:25:00+5:30
लोकसहभागाची गरज : १६५ किलोमीटर नदीकाठचा होणार अभ्यास
सातारा : माणगंगेच्या पुनरूज्जीवनासाठी लोकचळवळ अधिक प्रभावी व्हावी, यासाठी दुसरी परिक्रमा सुरू झाली आहे. परिक्रमेत माणगंगा सेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे, उपाध्यक्ष डॉ. विजय जाधव, सचिव प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, सदस्य संभाजी माळी, प्रा. अशोक शिंदे, गजानन बनकर, विठ्ठल चव्हाण, डॉ. बी. आर. फुले, बाळासाहेब सावंत, बसवेश्वर पाटणे, मोहन बुंजकर तसेच श्रीराम नानल, कविता म्हेत्रे, सुनील सूर्यवंशी, रूपेश कदम यांचा सहभाग आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
माणगंगा भ्रमणसेवा संस्थेच्या वतीने २०१० मध्ये पहिली परिक्रमा पूर्ण झाली. त्यामध्ये नदीची पूर्वीची भौगोलिक स्थिती, सद्याची दुरवस्थ यामधील तफावतीचा अभ्यासदौरा करून विविधांगी निरीक्षणे केली. त्याचा अहवाल तयार करून माणगंगेच्या विकासासाठी उपाययोजनांचा त्यात समावेश केला होता. परंतु नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम शासन किंवा प्रशासनावर न सोपविता त्यात लोकांचा सहभाग वाढविणे गरजेचे असल्यामुळे दुसऱ्या परिक्रमा सुरू करण्यात आली आहे.पहिल्या परिक्रमेतून व लोकप्रबोधनातून उगमस्थळाचे ठिकाण, माण, मलवडी, म्हसवड, वाढेगाव आदी ठिकाणी कामे हाती घेतली आहेत. नदीपात्रात स्वच्छता, वृक्षलागवड, बंधारे दुरुस्ती, वाळू उपशावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अशी कामे सुरू झाली आहेत. याचे महत्त्व नागरिकांना समजले पाहिजे. हाच दुसऱ्या परिक्रमेचा हेतू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
परिक्रमेचा दिनक्रम
बुधवार, दि. १८ फेब्रुवारीपासून परिक्रमा सुरू झाली आहे. सोमवार, दि. २३ रोजी सकाळी सात वाजता म्हसवड ते राजेवाडी अशी १५ किलोमीटर अंतरात काम होणार आहे. दि. २४ रोजी राजेवाडी ते दिघंची, दि. २५ रोजी दिघंची ते बलवडी, दि. २६ रोजी बलवडी ते वाटंबरे, दि. २७ रोजी वाटंबरे ते वाढेगाव, दि. २८ रोजी वाढेगाव ते देवळे, दि. १ मार्च रोजी देवळे ते ढवळस आणि दि. २ रोजी ढवळस ते सरकोली अशी एकूण १६५ किलोमीटर अंतरात अभ्यास परिक्रमा होणार आहे.
यामुळे झाली नदीची दुरवस्था
नदीपात्राचे मूळक्षेत्र अस्तित्वात नाही
उगमस्थळाच्या डोंगरदऱ्यात जी वृक्षराजी होती, ती राहिली नाही
नदीच्या दुतर्फा असणारी झाडे राहिली नाहीत
उत्पन्न देणारी पर्यावरण समतोल राखणारे झाडे ठेवली नाहीत
वाळू उपशामुळे पाण्याचे स्त्रोत संपले
उपद्रवी वनस्पतींचे निर्मूलन केले नाही
उपयोग कमी, तोटे जास्त असणारे बंधारे बांधले