चाफळ विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:19+5:302021-06-09T04:48:19+5:30
चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरण्यांच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी सोयाबीन ...
चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरण्यांच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी सोयाबीन व भुईमुगाच्या बियाण्यांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्या पडत असलेल्या पावसाने शेत जमिनीत वापसा तयार झाल्याने बळीराजा खरीप हंगामाच्या पेरणीच्या कामात व्यस्त झाला आहे.
विभागातील डोंगर कपारीतील चव्हाणवाडी, पाडळोशी, विरेवाडी, धायटी, केळोली, नाणेगाव खुर्द, चाहुरवाडी, दाढोली परिसरात शेतकऱ्यांनी शेतीची अंतर्गत मशागतींची कामे पूर्ण करत खरीप पिकांच्या पेरणीस प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.
दुर्गम व डोंगर दऱ्याखोऱ्यात चाफळ विभाग विखुरलेला आहे. विभागातील बहुंताश शेतीचे क्षेत्र हे कोरडवाहू असून संपूर्णत: शेती ही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे खरीप हंगाम हा या विभागातील शेतकऱ्यांचा मुख्य हंगाम ठरत असतो. विभागात गत पंधरवड्यात पाच-सात वेळा वळवाचा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपपूर्व अंतर्गत मशागतीची कामे उरकून घेतली होती. दरम्यान, डोंगरी विभागातील शेतकऱ्यांनी शेत जमिनीस वापसा तयार झाल्याने खरिपाच्या पेरण्यास प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. तर तळभागातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
विभागात भुईमूग, भात, हायब्रीड, सोयाबीन या मुख्य पिकांबरोबर कडधान्यांची पेरणी करण्यात येत आहेत. तर गणेवाडी, कोळेकरवाडी, विरेवाडी, जंगलवाडी, सडावाघापूर आदी ठिकाणी नाचणी पीक मुख्यत: घेतले जाते. कारण या ठिकाणच्या शेत जमिनीत पाणी साचून राहते, त्यामुळे ही जमीन निचऱ्याची समजली जाते. नाचणी पिकाच्या तरव्याचीही उगवण सध्या चांगल्या पद्धतीने झाली आहे. तर पाडळोशी, दाढोली, धायटी, केळोली आदी ठिकाणी भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथे भात पिकांच्या तरवे टाकले जात आहेत.
चौकट..
बियाण्यांच्या दरात वाढ..
विभागात सोयाबीन व भुईमुगाच्या बियाण्यांच्या दरात यावर्षी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विभागात आंतरमशागतीची कामे कमी अधिक प्रमाणात सुरू आहेत. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोनाचेे संकट असल्याने या काळात शेतातील मशागतीच्या कामांना वेग आला होता. वेळ मिळेल त्यानुसार शेताची नांगरट, कुळवणी, फणपाळी आदी आंतरमशागतीची कामे शेतकऱ्यांनी उरकली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस चांगला पडणार, असे संकेत वर्तवल्याने बळीराजा खरीप पेरणी उरकताना दिसत आहे.
०७चाफळ
चाहुरवाडी येथे शेतात खरीप हंगामातील पेरणी करताना शेतकरी अमोल कोसमकर व शेतकरी. (छाया : हणमंत यादव)