खरसुंडीत पौषी यात्रेस सुरूवात
By admin | Published: January 15, 2017 11:35 PM2017-01-15T23:35:30+5:302017-01-15T23:35:30+5:30
जनावरांची मोठी आवक : चलन तुटवड्याचा व्यवहारावर परिणाम
खरसुंडी : तीर्थक्षेत्र खरसुंडी येथील पौषी यात्रेत जातीवंत खिलार जनावरांची मोठी आवक झाली आहे. महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांतून व्यापारी गावात दाखल झाले आहेत. गेले दोन दिवस जनावरांच्या खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल होत आहे.
पौर्णिमेपासून चालू झालेल्या पौषी यात्रेमध्ये दोन दिवस शेंळ्या-मेंढ्यांची यात्रा भरली होती, तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात परिसरातील अनेक पशुपालक शेळ्या-मेंढ्या घेऊन आले होते. यावेळी शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल झाली. बाजारातील दर पडला असल्याने व्यापाऱ्यांची चंगळ होती, तर पशुपालकांत नाराजी दिसून आली. खिलार जनावरांच्या बाजारातही मंदी असल्याचे शेतकरी बोलत आहेत. दरवर्षी या ठिकाणी कोट्यवधीची उलाढाल होत असते. पण गेली काही वर्षे दुष्काळाने शेतकरी वर्ग त्रस्त असल्याने खरसुंडी पौषी यात्रा ही शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरत आहे. जनावरांना दर व्यवस्थित न मिळाल्याने, ४० हजाराचे असलेले खोंड जनावर २० हजारापर्यंतच विकून टाकत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचा मात्र फायदा होत असल्याचे यात्रेकरू बोलत आहेत. यातच गावामध्ये यात्रा कमिटी नसल्याने ग्रा.पं. प्रशासन व मार्केट कमिटी यांची धावाधाव करूनही समन्वय व नियोजनाअभावी तारांबळ उडत असते. हे प्रयत्नही अपुरे पडतात. गावामधून टेंभू योजनेचा कालवा गेल्याने यात्रा गावाच्या अनेक भागात विभागली गेली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना गावातील अनेक भागात फिरून पायपीट करावी लागत असल्याने व्यापारी लवकर माघारी फिरतात. त्यामुळे यात्रा लगेच फुटते, असा अंदाज छोटे-मोठे व्यापारी बांधत असल्याने, छोटे-मोठे हॉटेल, मिठाईवाले, शेतकरी, उद्योग व्यावसायिक यांनाही यात्रेमध्ये मंदी जाणवत आहे. त्यामुळे अनेकांना तोटा सहन करावा लागत असल्याचे व्यापारी बोलत आहेत.
तीर्थक्षेत्र खरसुंडी येथील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या नाथ नगरीतील पौषी यात्रा ही गेली काही वर्षे शेतकरी, छोटे-मोठे दुकानदार, मिठाईवाले यांना नुकसानीची ठरत आहे. नियोजनाअभावी यात्रा भरवत असताना ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान, कृषी उत्पन्न बाजार समिती यांना यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. योग्य नियोजन होत नसल्याने आणि जागेच्या प्रश्नामुळे गावामध्ये मनोरंजनाची कोणतीही व्यवस्था होत नाही.
लोकनाट्य तमाशा, छोटे-मोठे पाळणे यांनी तर या गावातील यात्रेकडे पाठ फिरविली आहे. कायम येणारे मिठाईवाले, मोठे हॉटेल व्यावसायिक तर, यात्रेतील खर्च निघत नसल्याने, शिवाय येथे योग्य ठिकाणी जागा मिळत नसल्याने यात्रेला न जाणेच पसंत करीत असल्याने, गावासाठी वैभव असलेली ही पौषी यात्रा मोडकळीस येते की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. जाणकर व जुन्या प्रतिष्ठित लोकांमधूनही अशी भीती व्यक्त होत आहे.
या यात्रेमध्ये मंगळवार दि. १७ जानेवारी रोजी भव्य जनावरांचे प्रदर्शन भरविले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ग्रा.पं. खरसुंडी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले असून विजेत्यास बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन खरसुंडी ग्रामपंचायत पटांगणात भरविण्यात येणार आहे, अशी माहिती उपसरपंच अर्जुन पुजारी यांनी दिली. या भव्य प्रदर्शनाचा लाभ जातीवंत खिलार जनावरांच्या हौशी मालकांनी घ्यावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी केले आहे. (वार्ताहर)