उत्तर कोरेगाव तालुक्यात आले लागवडीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:28 AM2021-06-01T04:28:35+5:302021-06-01T04:28:35+5:30
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुद्रुक परिसरात पिंपोडे बुद्रुक, घिगेवाडी, वाघोली, आसनगाव, चौधरवाडी, सर्कलवाडी, अनपटवाडी, करंजखोप, ...
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुद्रुक परिसरात पिंपोडे बुद्रुक, घिगेवाडी, वाघोली, आसनगाव, चौधरवाडी, सर्कलवाडी, अनपटवाडी, करंजखोप, सोनके, देऊर आधी परिसरामध्ये गेल्या दोन आठवड्यांत झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने तसेच तौक्ते वादळाच्या प्रभावामुळे या परिसरामध्ये चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी पिंपोडे बुद्रुकसह परिसरामध्ये आले लागवडीस सुरुवात केली आहे.
कोरोनोच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकता आला नाही. हा शेतीमाल विकला न गेल्यामुळे आले लागवडीसाठी पुरेसे पैसेही नसल्यामुळे शेतकऱ्यांना आले लागवडीसाठी कसरत करावी लागत आहे. पिंपोडे बुद्रुक परिसरामध्ये गेल्या दहा वर्षांपासून आल्याचे उत्पादन घेतले जाते.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने या भागात आले लागवड केली होती. यंदाही गेल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे या परिसरामध्ये आले लागवड पूर्व शेतीची मशागतीची कामे पूर्ण झाली असून, मागील चार दिवसांपासून या परिसरामध्ये मजुरांच्या साह्याने आले लागवड सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने बदलत्या हवामानात प्रतिकूल परिस्थितीतही आले पीक काही ना काही, शाश्वत उत्पादन देत आले आहे. येथे औरंगाबादी (सातारी ), उदयन पुरी, सुप्रभात या जातींच्या आल्याच्या लागवडी सुरू आहेत. सोमवारी परिसरामध्ये दुपारनंतर चांगला पाऊस झाल्याने आल्याच्या लागवडी पूर्ण बंद कराव्या लागल्या.
कोट...
शेतीची मशागतपूर्व कामे पूर्ण झाली होती. याचा चांगला फायदा आले लागवडीनंतर उगवणक्षमतेवर होतो. वातावरण पोषक असल्याने आले प्रतिगाडी आठ ते दहा हजार पाचशे रुपये इतक्या दराने घेत आहे.
-सुनील निकम, प्रगतशील शेतकरी, पिंपोडे बुद्रुक