जावळीत अवैध दारु धंद्यावर राज्य उत्पादन शुल्कचे धाडसत्र, ३७ जणांविरोधात गुन्हा
By नितीन काळेल | Published: August 4, 2023 07:09 PM2023-08-04T19:09:33+5:302023-08-04T19:13:28+5:30
अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सातारा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील सहा दिवसांपासून जावळी तालुक्यातील अवैध दारु धंद्यावर धाडसत्र सुरू केले आहे. यातूनच आतापर्यंत एकूण ३७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सुमारे अडीच लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
याबाबत विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसांपासून जावळी तालुक्यातील अवैध दारुविक्रेत्यांवर धडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. दि. ३ आॅगस्ट रोजीही विक्रम उत्तम पवार (रा. कुडाळ), मुकेश शिवाजी नवले, सुधीर शंकर भिसे (रा. सायगाव) आणि बाबासाहेब दिनकर भिसे (रा. हुमगाव) यांच्या घरी तसेच दारु अड्यांवर धाडी टाकल्या. तसेच देशी, विदेशी दारु, बिअर असा मिळून सुमारे ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने मागील सहा दिवसांत जावळी तालुक्यातच अवैध दारुचा पुरवठा करणारे आणि अवैध दारुधंद्यावर कारवाई करत ३७ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्या ताब्यातून दारु, बिअरचा एकूण २ लाख ५४ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
या कारवाईत निरीक्षक श्रीकांत खरात, माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, प्रतिक ढाले, सहायक दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, अमोल खरात, जवान मनिष माने, अरुण जाधव, नरेंद्र कलकुटगी, किरण जंगम, आबासाहेब जानकर, महेश देवकर आदींनी सहभाग घेतला.