राज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी: महादेव जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:21 PM2019-05-05T23:21:18+5:302019-05-05T23:21:22+5:30
म्हसवड : ‘राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक कामे केली; मात्र निसर्गाची साथ मिळाली नसल्याने राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती ...
म्हसवड : ‘राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक कामे केली; मात्र निसर्गाची साथ मिळाली नसल्याने राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सध्या आठ लाख जनावरे सरकारी छावणीत दाखल झाली
आहेत. जिल्ह्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, जिहे कटापूर योजनेचे पाणी लवकरच माण तालुक्यात येणार आहे. राज्य सरकार दुष्काळाच्या परिस्थितीत संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे,’ अशी ग्वाही मंत्री महादेव जानकर यांनी दिली.
पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हे रविवारी जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. त्यांनी माण तालुक्यातील माळवाडी (वरकुटे), म्हसवड व मोगराळे येथील जनावरांच्या चारा छावणीत भेट दिली. मार्डी, गोंदवले येथे कुदळ, फावडे हाती घेऊन श्रमदान करून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढू, अशी ग्वाही जानकर यांनी दिली.
राज्यात अनेक ठिकाणी मोठा दुष्काळ पडला असून, पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत, जनावरे तडफडत आहेत. यावर तत्काळ मार्ग काढण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळाग्रस्त भागात मंत्र्यांनी दौरे काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हे सातारा जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. शनिवारी सायंकाळी त्यांनी माळवाडी (वरकुटे) येथील जनावरांच्या चारा छावणीस भेट दिली.
यावेळी शेतकºयांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत सरकार दुष्काळग्रस्तांसाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
त्यानंतर रविवारी सकाळी आठ वाजता मार्डी येथील आयोजित करण्यात आलेल्या महाश्रमदानात सहभागी होऊन कुदळ, फावडे हाती घेत श्रमदानही केले. गोंदवले खुर्द गावातही महाश्रमदान केले. दुपारी म्हसवड येथील माणदेशी व मोगराळे येथील चारा छावणीस भेट दिली. यावेळी शेतकºयांसोबत चारा छावणीत भोजन केले.
यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, राज्य कार्यकारणी सदस्य बबन वीरकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, रासपाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब दोरगे, माण-खटाव विधानसभा अध्यक्ष अप्पासाहेब पुकळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूजा घाडगे, तालुकाध्यक्ष शुभांगी फडतरे, तालुकाध्यक्ष सीमा बनसोडे, श्रीकांत देवकर, खटाव तालुकाध्यक्ष डोईफोडे उपस्थित होते. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी मोठे संख्येने उपस्थित राहून श्रमदानात सहभागी झाले.
गजीनृत्याने केले स्वागत..
मार्डी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे स्वागत ढोल, ताशा, सनई, बँड आणि गजी नृत्याच्या तालात करण्यात आले. यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना पुन्हा ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी जलसंधारण कामाच्या ठिकाणी चाललेल्या गजीनृत्यात पुन्हा ढोल बडवला.