दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी राज्य शासन ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:39 AM2021-07-28T04:39:53+5:302021-07-28T04:39:53+5:30
वाई : देवरुखवाडी येथील नुकसानग्रस्तांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे असून, ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही ...
वाई : देवरुखवाडी येथील नुकसानग्रस्तांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे असून, ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
वाई तालुक्यातील देवरुखवाडी (कोंडावळे) येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन जवळपास १४ घरांची हानी झाली. तसेच अनेक जनावरेदेखील मृत्यूमुखी पडली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आमदार मकरंद पाटील यांच्या समवेत या गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
देवरूखवाडी येथील धोकादायक घरांमधील व्यक्तिंना गावच्या प्राथमिक शाळेत व मंदिरांमध्ये स्थलांतरित करून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंत्री पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली व ग्रामस्थांचे सांत्वन केले. दरम्यान, जांभळी येथील खचलेल्या जमिनीचीदेखील त्यांनी पाहणी केली. जांभळी यानंतर त्यांनी बोटीतून जोर, गोळेगांव, गोळेवाडी गावासह भातशेती, पडलेली घरे, वाहून गेलेले बंधारे यांचा आढावा घेतला. पावसाळ्यात ग्रामस्थांना प्रचंड तणावाखाली वावरावे लागते. नैसर्गिक आपत्तीचा ग्रामस्थ व शेतकऱ्यांना नेहमीच सामना करावा लागतो. जोर, गोळेगांव, गोळेवाडी या गावांमध्ये राहण्याची सध्या परिस्थिती नाही. त्यामुळे आमचे देवरुखवाडीप्रमाणे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजीत भोसले, वाई पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे, उपविभागीय बांधकाम अधिकारी श्रीपाद जाधव, संजय शिंदे उपस्थित होते.
फोटो : २७ भिलारे
पालकमंत्री बाळासाहेब पाटील व आमदार मकरंद पाटील यांनी वाई तालुक्यातील देवरुखवाडी या गावाला भेट देऊन येथील नुकसानीचा आढावा घेतला.