आरक्षणाबाबत राज्य सरकार असंवेदनशील, सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 04:19 PM2024-07-22T16:19:27+5:302024-07-22T16:20:46+5:30

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन

State government insensitive about reservation, Criticism by Supriya Sule | आरक्षणाबाबत राज्य सरकार असंवेदनशील, सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र

आरक्षणाबाबत राज्य सरकार असंवेदनशील, सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र

कऱ्हाड : दहा वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले होते. मात्र, नंतर दिल्लीत असे आरक्षण देता येत नसल्याचे सांगितले. दोनशे आमदार असतानाही जे ठराव करू शकत नाहीत, ते इतर समाजांना आरक्षण काय देणार. आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नसून केवळ चालढकल करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने व पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मराठा आरक्षणासह धनगर, लिंगायत, मुस्लीम, भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही आधीपासूनच आग्रही आहोत. या समाजांना आरक्षण मिळण्याची मागणी आम्ही यापूर्वीच केली आहे. याबाबत राज्य शासनाने केंद्राकडे ‘कन्सॉलिडेटेड बिल’ पाठवावे. आम्ही त्यांना मदत करू. राज्यातील ‘एमबीबीएस’ म्हणजे महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी सरकार हद्दपार करून पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र बनवण्याची गरज आहे.

महागाई, बेरोजगारीमुळे जनता अडचणीत आहे. दूध, शेतमालाला भाव नाही. ११८ कोटींचा भ्रष्टाचार फक्त शेतीमध्ये झाला असल्याचा आरोप ‘आरएसएस’ने त्यांच्या वृत्तवाहिनीवर केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणारे ११८ कोटी सरकारने निकृष्ट बियाणे खरेदी करण्यासाठी वापरल्याचे ‘आरएसएस’ने सांगितले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याची गरज होती. मात्र, ते केले नाही. कापूस, सोयाबीन, दूध, कांद्याला दर नाही. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायचे सरकारने ठरवले आहे.

जाती-जातीत तेढ निर्माण करणारी भाषणे सरकारकडून येत आहेत. राज्याच्या विकासाबाबत सरकार गंभीर नाही. आयकर, सीबीआय, ईडीमार्फत घर, पक्ष फोडण्याचे उद्योग सुरू आहेत. दोन वर्षांत या सरकारने काय क्रांती केली? कांद्याच्या प्रश्नावर आवाज उठवल्यावर तुमच्या तीन जिल्ह्यांसाठी देशाला वेठीस का धरायचे, अशी उत्तरे देण्यात आली. त्यामुळे नाशिककरांनी त्यांना मतदानातून उत्तर दिले आहे.

पिपाणी अन् तुतारीमुळे घोळ झाला!

आमदार शशिकांत शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमची ताकद कमी पडली. आमचा पक्ष नेला. चिन्ह नेले. आमदार आणि खासदारही नेले. माझ्या मतदारसंघात तर सोसायटी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य, कारखाने, दूध संघही नेले. सत्ता त्यांची. यंत्रणा त्यांची. कुठूनकुठून मिळालेला निधीही त्यांचा. आमच्याकडे फक्त कष्टकरी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते होते. जनताही आमच्या पाठीशी उभी राहिली. बारामती आधी सातारची जागा जिंकण्याची खात्री होती. दुर्दैवाने पिपाणी आणि तुतारीमुळे घोळ झाला. सरकारने रडीचा डाव खेळला.

Web Title: State government insensitive about reservation, Criticism by Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.