राज्यात दंगली घडविण्याचे काम सरकार करतंय : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:44 AM2018-05-22T00:44:05+5:302018-05-22T00:44:05+5:30
‘कोरेगाव-भीमा’ तर आता नुकतीच झालेली औरंगाबाद येथील दंगल ही पूर्वनियोजित असून, राज्यातील भाजप-सेनेचे सरकारच दंगली घडवून राज्यात अराजकता माजवण्याचे काम करीत आहे,
सायगाव : ‘कोरेगाव-भीमा’ तर आता नुकतीच झालेली औरंगाबाद येथील दंगल ही पूर्वनियोजित असून, राज्यातील भाजप-सेनेचे सरकारच दंगली घडवून राज्यात अराजकता माजवण्याचे काम करीत आहे,’ असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर केला.
करहर, ता. जावळी येथे जावळी बँकेचे नूतन अध्यक्षपदी चंद्र्रकांत गावडे-पाटील, उपाध्यक्षपदी प्रकाश मस्कर यांच्या निवडीच्या सत्कार समारंभप्रसंगी व आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंत मानकुमरे, सभापती अरुणा शिर्के, अर्चना रांजणे, राजू ओंबळे, जयदीप शिंदे, हिंदुराव तरडे, सौरभ शिंदे, जावळी बँकेचे माजी अध्यक्ष विक्रम भिलारे, जावळी बँकेचे सर्व संचालक, सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘जनतेला भाजपा-शिवसेना युती सरकारची नौटंकी समजली असून, भाजप-शिवसेनेने केलेल्या पापाचे उत्तर कर्नाटक जनतेने दिले तसेच आगामी काळात महाराष्ट्रातील जनता देखील सरकार मोडीत काढून माथाडी कामगारांना, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या या भाजप-सेनेच्या सरकारला घरी बसवेल.
सरकारने राज्यातील सहकार अडचणीत आणला आहे. सरकार जिथं निधीची गरज नाही तिथं स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी निधी टाकत आहे.भाजप सरकारच्या विविध धोरणावर कडाडून टीका केली. राज्य सरकाने प्रत्येक विषयावर कमिट्या करायच्या; पण पुढे बैठकाच लावायच्या नाहीत. केवळ झुलवा झुलवी करायची, हे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. सरकारने विकासाच्या नावाखाली सुरू असलेली नौटंकी थांबवावी.’
आमदार शिंदे म्हणाले, ‘बँकेच्या कामकाजात कधीही राजकारण येऊ देणार नाही. बँकेचे कर्जदार सामान्य असून, कोणी मोदी, अंबानी नाही म्हणून बँकेला कोणताही धोका नाही.’ आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे दर्जेदार होत आहेत. ही कामे मंजूर करण्याचे काम आमदार करतात; परंतु काहीजण दिशाभूल करत आहेत. दुसºयांच्या कामाचे आपण कधीच श्रेय घेतत्त नाही.
गेली दहा वर्षे तालुक्यातील जनतेला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. लोकांच्या विश्वावर मी तर निवडणुकीत उभा आहेच; पण विरोधात कोणीही राहिले तरीही त्याला घरी बसवणार, हे निश्चित.’ यावेळी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा एकत्रित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावडे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष मस्कर यांनी आभार मानले.
मानकुमरेंचा निरोप पोहोचविणार..
वसंतराव मानकुमरेंनी या कार्यक्रमात आपल्याला खासदारकीचे तिकीट मिळावे, अशी मागणी केली. तर तोच धागा पकडून आमदार अजित पवार म्हणाले, ‘वसंतराव जरा धीराने घ्यावे, आपली तिकिटाची अपेक्षा आहे, हा आपला निरोप शरद पवारांपर्यंत तसेच प्रदेशाध्यक्षांपर्यंत नक्कीच पोहोचवेन.’ शिवेंद्रसिंहराजेंनी पक्षाने मानकुमरेंना उमेदवारी दिली तर उमेदवारी अर्जावर मीच सूचक राहीन, हेच भाषणात जाहीर करून त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले.
करहर येथे जावळी बँकेच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे आदी उपस्थित होता.