मलकापूर कन्या सुरक्षा अभियानाचा पॅटर्न स्वीकारला राज्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:10 AM2021-03-13T05:10:08+5:302021-03-13T05:10:08+5:30
मलकापूर : अर्थमंत्र्यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यात ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी प्रवास सवलत योजना ...
मलकापूर : अर्थमंत्र्यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यात ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी प्रवास सवलत योजना जाहीर केली. त्या योजनेंतर्गत सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची तरतूद केली आहे. मात्र, मलकापूर नगरपालिकेने शहरातील मुलींना मोफत प्रवासासह स्वतंत्र बस ही योजना ९ वर्षांपासून सुूरू केली आहे. या योजनेचा आदर्श घेऊन कन्या सुरक्षेचा पॅटर्न राज्य सरकारने स्वीकारला आहे.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सोमवारी सादर केला. अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी प्रवास सवलत योजना ही महत्त्वाची घोषणा केली. मात्र मलकापूर पालिकेने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या संकल्पनेतून व तत्कालीन महिला नगरसेविकांच्या पाठपुराव्याने २०१३ मध्ये मुलींना मोफत प्रवास व स्वतंत्र बसची सोय ही योजना सुरू केली आहे.
पालिकेने श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान असे नाव या योजनेला दिले आहे. पालिका ही योजना नऊ वर्षांपासून यशस्वीपणे राबवत आहे. यानुसारच यावर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात शालेय मुलींसाठी मोफत बसची घोषणा राज्य सरकारने केली. असे असले तरी मलकापूरमध्ये मात्र ही योजना पालिका स्वखर्चातून व एसटी महामंडळाच्या सहकार्याने राबवत आहे. त्याच पध्दतीने अजित पवार यांनी महाराष्ट्र हे महिला धोरणांसाठी अग्रेसर राज्य असल्याचे विधानसभेत बोलाताना म्हटले आहे. मुलींच्या शिक्षणासाठी राज्याने अनेक प्रोत्साहनपर निर्णय घेतले आहेत. मुलींचे बारावीपर्यंत शिक्षण मोफत केल्यानंतर राज्यातील सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी प्रवास सवलत योजना असे नाव दिले आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाला पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रिड बस उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे.
कोट
दरवर्षी सातशे मुलींना लाभ
मलकापूर पालिकेतील तत्कालीन महिला नगसेविकांच्या पाठपुराव्याने २०१३ पासून मुलींना मोफत प्रवास व स्वतंत्र बस ही योजना अखंडितपणे सुरू आहे. दरवर्षी शहरातील ७०० ते ८०० मुलींना या आभियानाचा फायदा होत आहे. या योजनेत केवळ मुलींसाठीच स्वतंत्र बस असल्यामुळे शहरातील मुलींचा सुरक्षित प्रवास होत आहे, अशी माहिती नगराध्यक्ष निलम येडगे यांनी दिली.
कोट
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना प्रमिलाताई चव्हाण कन्या सुरक्षा योजना या नावाने योजनेचा शुभारंभ केला होता. पालिकेच्या अर्थसंकल्पात महिला व बाल कल्याण विभागातून खर्चाची तरतूद केली जाते. मुलींना स्वतंत्र बस व मोफत प्रवासाचा मलकापूर पॅटर्न राज्याने स्वीकारल्याचा आनंद आहे.
मनोहर शिंदे,
उपनगराध्यक्ष
फोटो :
मलकापूर येथे मुलींच्या मोफत एसटी प्रवास योजनेचा शुभारंभ करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व इतर (संग्रहित फोटो )
माणिक डोंगरे