राज्याचे तीन वर्षांचे कृषी पुरस्कार जाहीर; साताऱ्यातील ११ जणांचा सन्मान

By नितीन काळेल | Published: February 24, 2024 01:28 PM2024-02-24T13:28:21+5:302024-02-24T13:31:16+5:30

कृषी पुरस्कारात सातारा जिल्ह्याचा डंका

State three year agriculture awards announced; Honor of 11 people from Satara | राज्याचे तीन वर्षांचे कृषी पुरस्कार जाहीर; साताऱ्यातील ११ जणांचा सन्मान

राज्याचे तीन वर्षांचे कृषी पुरस्कार जाहीर; साताऱ्यातील ११ जणांचा सन्मान

सातारा : राज्य शासनाने २०२० ते २०२२ या तीन वर्षातील कृषी पुरस्कार जाहीर केले असून यात सातारा जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे. यामध्ये माण, खंडाळा, वाई आणि फलटण तालुक्यातील प्रत्येकी दोघां शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार मिळाला आहे.

राज्य शासनाच्या वतीने कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पदन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना डाॅ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण आणि आदिवासी गट), पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार (आयुक्त व मंत्रालय स्तर) असे पुरस्कार देण्यात येतात. शुक्रवारी राज़्य शासनाने २०२० ते २०२२ या तीन वर्षातील पुरस्कार जाहीर केले आहेत.

सातारा जिल्ह्यातील एकूण १२ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील ११ शेतकरी आहेत. २०२० चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) पुरस्कार वरखडवाडी, ता. वाई येथील नितीन बाजीराव वरखडे यांना जाहीर झाला आहे. तर २०२१ चा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार फलटण तालुक्यातील कुरवली बुद्रुकच्या सचिन साधू सांगळे यांना मिळाला आहे. २०२१ चाच कृषीभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार अरुण चंद्रकांत कचरे (वाघेरी, ता. कऱ्हाड) यांना जाहीर करण्यात आला आहे. २०२१ चा युवा शेतकरी पुरस्कार धामणेर, ता. कोरेगाव येथील साैरभ विनयकुमार कोकीळ यांना जाहीर करण्यात आला आहे. २०२१ चा उद्यानपंडित पुरस्कार रामदास भुजंगराव कदम (रा. गिरवी, ता. फलटण) यांना देण्यात येणार आहे.

२०२१ या वर्षातील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) पुरस्कार अधिक मारुती माने (रा. मानेगाव, ता. पाटण) यांना मिळाला आहे. २०२२ चा कृषीभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार माण तालुक्यातील देवापूरच उध्दवराव ज्ञानेश्वर बाबर यांना प्रदान करण्यात येणार आहे. २०२२ चाच वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार संदीप राजाराम डाकवे (रा. डाकेवाडी, ता. पाटण) यांना जाहीर झाला आहे. २०२२ चा युवा शेतकरी पुरस्कार आसवली, ता. खंडाळा येथील नीलेश हणमंत पवार यांना मिळाला आहे. तर टाकेवाडी, ता. माण येथील जालिंदर जगन्नाथ दडस यांना २०२२ चा उद्यानपंडित पुरस्कार जाहीर झाला आहे.

२०२२ चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) खडकी, ता. वाई येथील प्रशांत भिकू शिंगटे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर फलटण तालुक्यातील सासकल येथील कृषी सहाय्यक सचिन जाधव यांना २०२२ चा पद्यश्री डाॅ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे.

कर्णवाडीच्या महिला शेतकरीही पुरस्कार..

शासनाच्या वतीने महिला शेतकऱ्यांनाही कृषी पुरस्कार देण्यात येतो. कर्णवडी, ता. खंडाळा येथील रुपाली सत्यवान जाधव यांना २०२२ चा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. राज्य शासनाच्या तीन वर्षातील कृषी पुरस्कारात सातारा जिल्ह्याने अधिक पुरस्कार मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: State three year agriculture awards announced; Honor of 11 people from Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.