मार्डी सुरू करण्यासाठी प्रशासनाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:05+5:302021-07-10T04:27:05+5:30
पळशी : माण तालुक्यातील मार्डी गावात रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने मार्डी ग्रामपंचायतीने २ जुलै राजी प्रशासनास मार्डी गाव व सर्व ...
पळशी : माण तालुक्यातील मार्डी गावात रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने मार्डी ग्रामपंचायतीने २ जुलै राजी प्रशासनास मार्डी गाव व सर्व दुकाने सुरू करण्यासाठी लेखी अर्जाद्वारे विनंती केली होती. मात्र, अद्यापही प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नसल्याने तत्काळ दुकाने सुरू करण्याबाबत शिवसेना मार्डी शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले. अन्यथा प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा लेखी निवेदनात दिला आहे.
या वेळी माधव राऊत, पिंटू पोळ, दीपक पाटील आदी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून मार्डी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याचप्रमाणे प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करण्यात आले. त्यामुळे सध्या मार्डी गावात केवळ दोनच रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तीन महिन्यांपासून गाव बंद असून, हाताला रोजगार नसल्याने अनेकांची आर्थिक ओढाताण सुरू आहे. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने उधारी उसनवारीही बंद झाली आहे. त्यामुळे अनंत अडचणींचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे.
अनेकांची साठवलेली जमापुंजी कधीच संपून गेली असल्याने खासगी सावकाराचे उंबरठे कित्येक जण झिजवत असून, अव्वाच्या सव्वा दराने घरखर्चासाठी मदत मागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन मार्डी गावातील सर्व दुकाने सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.