स्टेशनात जीवघेणा ‘शॉर्टकट’!

By admin | Published: March 27, 2015 10:51 PM2015-03-27T22:51:06+5:302015-03-27T23:58:30+5:30

दोन मिनिटांसाठी प्रवाशांची कसरत : फलाटावरून सरळ रुळावर उडी; पादचारी पूल ‘असून अडचण, नसून खोळंबा’--आॅन दि स्पॉट

Stationary 'Shortcut'! | स्टेशनात जीवघेणा ‘शॉर्टकट’!

स्टेशनात जीवघेणा ‘शॉर्टकट’!

Next

पंकज भिसे- विद्यानगर --ओगलेवाडी रेल्वे स्थानकात रुळ ओलांडण्यासाठी पायपूल आहे. मात्र, या पादचारी पुलाच्या पायऱ्या निखळल्याने तो धोकादायक बनला असून, अनेक प्रवासी धोकादायकरीत्या रुळ ओलांडत असल्याचे दिसून येत आहे.
ओगलेवाडी रेल्वेस्थानकात दोन प्लॅटफॉर्म आहेत. या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून पॅसेंजर, एक्स्प्रेस व मालगाडीही मार्गस्थ होत असते. या तिन्ही गाड्यांचा वेग जास्त असतो. त्यामुळे प्रवाशांना रुळ ओलांडताना अडचणी येऊ नयेत, अपघात होऊ नयेत, यासाठी स्थानकावर पायपूल बांधण्यात आला आहे. या पायपुलावरून प्रवाशांना सुरक्षितरीत्या रुळ ओलांडता येतो. पूर्वी त्याचा सर्रास वापर केला जायचा. मात्र, सध्या हे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. प्रवासी धोकादायकरीत्या रुळ ओलांडताना दिसून येत आहेत.
स्थानकावरून मार्गस्थ होणाऱ्या गाड्यांची संख्याही सध्या वाढली आहे. चोवीस तासांत पॅसेंजर, एक्स्प्रेस व मालगाडी अशा अनेक गाड्या येथून मार्गस्थ होतात. गाडी प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वी ध्वनिक्षेपकावर त्याची सूचना केली जाते. तसेच रेल्वेच्या भोंग्याचा आवाजही दूरवर ऐकू येतो. अशा परिस्थितीत रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक असते. वास्तविक, रेल्वे रुळापासून प्लॅटफॉर्म जास्त उंचीवर आहे. त्यामुळे प्रवाशांना रुळावर उतरायचे असल्यास उडी मारावी लागते किंवा स्थानकापासून काही अंतरावर असणाऱ्या पायपुलापर्यंत चालत जाऊन तेथील कमी उंचीवरून खाली उतरावे लागते. बहुतांश प्रवासी पायपुलापर्यंत जातातही. मात्र,
रुळ ओलांडण्यासाठी पुलाचा वापर न करता सरळ रुळावर उडी घेऊन चालतच ते ओलांडतात. या परीस्थितीकडे कोणाचेही लक्ष नसते. कऱ्हाडच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी जास्त नसली तरी अशा पद्धतीने प्रवाशांनी रुळ ओलांडणे धोक्याचेच आहे. वास्तविक, कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाला अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याने येथील स्थानकाचे महत्त्वही वाढणार आहे. हे स्थानक ‘जंक्शन’ होण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे उपाययोजना करणे गरजेचे आहे.


एक्स्प्रेस गाड्या
कोल्हापूरकडे जाणाऱ्या
मुंबई - कोल्हापूर (सह्याद्री एक्स्प्रेस), पुणे - एर्नाकुलम, मुंबई - कोल्हापूर (महालक्ष्मी एक्स्प्रेस), दादर - पाँडेचरी, दादर - तिरुनवल्ली एक्स्प्रेस, दादर - म्हैसूर (शरावती एक्स्प्रेस),
अजमेर - म्हैसूर, गांधीधाम - बेंगलोर, जोधपूर - बेंगलोर, अजमेर - यशवंतपूर (गरीबनवाज एक्स्प्रेस), गोंदिया - कोल्हापूर (महाराष्ट्र एक्स्प्रेस), हज निजामुद्दीन - कोल्हापूर, हज निजामुद्दीन - म्हैसूर एक्स्पे्रस, मुंबई - कोल्हापूर (कोयना एक्स्प्रेस), मुंबई - हुबळी, हज निजामुद्दीन - वास्को (गोवा एक्स्प्रेस).


1पुण्यावरून कोल्हापूरला जाणाऱ्या व कोल्हापूर ते पुण्याला जाणाऱ्या एक्स्प्रेस अकरा, पॅसेंजर चार, सुपरफास्ट एक्स्प्रेस दोन अशा प्रकारे दररोज सतरा गाड्या कऱ्हाड रेल्वे-स्थानकातून जातात. येथे दोन प्लॅटफॉर्म आहेत.
2रेल्वेस्थानकात स्वच्छतेसाठी स्त्री-पुरुष कामगार असूनही रुळावर कचऱ्याचे प्रमाण जास्त दिसते. या कचऱ्यामुळे स्थानकावर सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. दुर्गंधीमुळे प्रवाशांना नाकाला रूमाल लावूनच येथे रेल्वेची वाट पाहत तासन्तास थांबावे लागते. कचरा व दुर्गंधीमुळे प्रवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
3प्लॅटफॉर्मवरून रुळावर उतरण्यासाठी प्रवाशांनीच दगडाच्या पायऱ्या तयार केल्या आहेत. आसपासचे दगड उचलून आणून ते रुळाजवळ ठेवले आहेत. त्यावर उडी घेत प्रवासी रुळावर उतरतात व धोकादायकरीत्या रुळ ओलांडतात.
4कोल्हापूर व मुंबईवरून येणा-जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सध्या वाढत आहे. त्यातच सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होणार आहेत. त्यामुळे कधी-कधी प्लॅटफॉर्मवर उभे राहण्यासही प्रवाशांना जागा मिळत नाही. दररोज मुंबई, कोल्हापूरसह इतर ठिकाणांहून कऱ्हाड स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे तेराशे आहे. तर येथील स्थानकावरून इतर शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही बाराशेच्या आसपास आहे..
5सातारा-कोल्हापूर पॅसेंजर व पुणे-कोल्हापूर पॅसेंजर या दोन गाड्या कऱ्हाड रेल्वे स्थानकातून कोल्हापूरकडे मार्गस्थ होतात. तर कोल्हापूर-पुणे पॅसेंजर व कोल्हापूर-सातारा पॅसेंजर या दोन गाड्या पुण्याकडे धावतात.


पुण्याकडे जाणाऱ्या
एर्नाकुलम - पुणे, कोल्हापूर - मुंबई (सह्याद्री एक्स्प्रेस), हुबळी - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई, कोल्हापूर - मुंबई (कोयना एक्स्प्रेस), कोल्हापूर - हज निजामुद्दीन एक्स्प्रेस, म्हैसूर - हज निजामुद्दीन एक्स्प्रेस, म्हैसूर - अजमेर एक्स्प्रेस, बेंगलोर - गांधीधाम एक्स्प्रेस, बेंगलोर - जोधपूर एक्स्प्रेस, यशवंतपूर - अजमेर (गरीबनवाज एक्स्प्रेस), कोल्हापूर - गोंदिया (महाराष्ट्र एक्स्प्रेस), दादर - पाँडेचरी एक्स्प्रेस.

प्लॅटफॉर्मलगत असलेल्या दगडाच्या पायऱ्या रेल्वे प्रशासनाच्या कामगारांसाठी आहेत. कामगार त्या पायऱ्यांवरून रुळावर उतरतात व स्वच्छता करतात. प्रवाशांना रुळ ओलांडण्यासाठी पायपुलाची सोय आहे. मात्र, प्रवासी पायाला त्रास न देण्यासाठी शॉर्टकट मारतात. प्रत्येक प्रवाशाला आम्ही समजावून सांगू शकत नाही. प्रवाशांनी स्वत:चा जीव धोक्यात घालू नये. - एम. एस. स्वामी, स्टेशन मास्तर, कऱ्हाड

Web Title: Stationary 'Shortcut'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.